चाचणी न करताच अहवाल कोरोनाबाधित

    दिनांक :03-May-2021
|
- रजेगाव ग्रारुचा प्रताप
तभा वृत्तसेवा
गोंदिया,  
कोविड विषाणूची चाचणी न करताच एका युवकाला बाधित असल्याचा अहवाल पाठविल्याचा प्रताप तालुक्यातील रजेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या चाचणी केंद्राच्या कर्मचार्‍यांनी केला आहे. यामुळे सदर युवकाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी युवकाने जिल्हाधिकारी, शल्यचिकीत्सक यांना 2 मे रोजी दिलेल्या तक्रारीद्वारे केली आहे. याबाबत असे की, तालुक्यातील गर्रा खुर्द येथील सचिन भैयालाल बोपचे यांनी त्यांचे काका कुंजीलाल बोपचे यांना 22 एप्रिल रोजी रजेगाव ग्रामीण रुग्णालय येथील कोविड चाचणी केंद्रावर नेले. 

test _1  H x W: 
 
यावेळी तेथे कार्यरत कर्मचार्‍यांनी कुंजीलाल बोपचे यांच्या नावाची नोंदणी करून घेतली. यानंतर रितसर त्यांच्या घस्यातील स्त्रावाचा नमुणा तपासणीसाठी घेतला. यानंतर तब्बल सात दिवसांनंतर अहवाल पाठविला. त्यात कुंजीलाल यांच्या ऐवजी त्यांचा पुतण्या सचिन बोपचे यांचा नाव नोंद असल्याचे दिसताच सचिन यांच्या पायाखालची जागाच सरकली. त्यात त्यांना बाधित दाखविण्यात आले. चाचणीसाठी नमुना न देता बाधित म्हणून अहवालात नोंद केलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारावरून आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या पुर्वी देखील देवरी तालुक्यात काकाचा अहवाल पुतण्याला दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 
 
तक्रारीत तथ्य नाही - डॉ. दोडके
यासंर्भात रजेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय दोडके यांना विचारणा केली असता, येथील चाचणी केंद्रातील कर्मचारी सर्वप्रथम रुग्णांच्या नावाची नोंद करतात. नमुना घेतल्यानंतरच त्याची संबंधित अ‍ॅपवर आभासी नोंद केली जाते. नमुना घेऊन अहवाल दिल्याचे चाचणी केंद्रावरील कर्मचार्‍यांनी सांगीतले. बोपचे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यात तथ्य आढळले नसल्याचे दोडके यांनी सांगीतले.
 
 
aha _1  H x W:
 
दोषींवर कारवाई करा - बोपचे
आपण 15 एप्रिल रोजी आरटीपीसीआर चाचणी केली त्याचा नकारात्मक अहवाल देखील आपल्याला मिळाला. मात्र 22 एप्रिल रोजी चाणणीसाठी नमुणा न देताच अहवाल बाधित आल्याचा धक्काच बसला. चाचणी न करताच खोटा व सकारात्मक रिपोर्ट देणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी, शल्यचिकीत्सक यांना केलेल्या तक्रारीद्वारे केल्याचे सचिन बोपचे यांनी प्रतिनिधीस सांगीतले.