14 वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला

    दिनांक :03-May-2021
|
- चाईल्ड लाईन व बाल सरंक्षण कक्षाची कारवाई
पथ्रोट,
जिल्हाभरातील बाल विवाह थांबता थांबवता नाकी नऊ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कायद्याने मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर करणे बंधनकारक असतानाही वधुपिता बालविवाह करीतच असून समाजही आपली मूक संमती दर्शवितच आहे. सोमवारी पथ्रोट पोलिस ठाणे हद्दीतील टवलार येथील 14 वर्षीय बालिकेचा विवाह रोखण्यात आल्याची घटना घडली.
 
fgfdh_1  H x W:
 
 
अचलपूर तालुक्यातील टवलार येथे14 वर्षीय बलिकेचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील 21 वर्षीय व्यक्तीसोबत होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनला 2 मे रोजी प्राप्त झाली. सदर माहिती चाईल्ड लाईनचे केंद्र प्रमुख अमित कपूर यांच्यामार्फत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले व बाल सरंक्षण अधिकारी भूषण कावरे यांना देण्यात आली. माहितीच्या आधारावर चाईल्ड लाईनचे शंकर वाघमारे व बाल सरंक्षण कक्ष समुपदेशक आकाश बरवट, भूषण कावरे यांनी पथ्रोटचे सहायक पोलिस निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधून पीएसआय वसुकार यांच्या चमूसोबत टवलार ग्राम गाठले.
 
 
या गावामध्ये बालविवाह होत असलेल्या ठिकाणी भेट देण्यात आली. मुलीच्या आई-वडिलांना घेऊन ग्राम बाल सरंक्षण समितीची बैठक घेण्यात आली. या ठिकाणी सर्वांची बैठक घेऊन बालविवाह अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्ष होईपर्यंत लग्न करणार नाही, असे हमीपत्र ग्राम बाल सरंक्षण समिती व मुलीच्या आईवडिलांसमक्ष भरून घेण्यात आले व मुलींच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मुलीला 18 वर्ष होईपर्यंत मुलीचे संगोपन बालगृहात करता येईल असे सांगण्यात आले. ही कारवाई करीत असताना अंगणवाडी सेविका, सरपंच, पोलिस पाटील, आशा सेविका, मुख्याध्यापक, तसेच गावातील सदस्य उपस्थित होते.
 
 
एका महिन्यात रोखले 8 बालविवाह
जिल्ह्यामध्ये बाल विवाह होण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या एक महिन्यात बाल सरंक्षण कक्षाला 8 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करण्यात येऊ नये, अन्यथा लग्नाला उपस्थित सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करावी लागेल, असे बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे यांनी सांगितले. याबाबत बोलताना पथ्रोटचे सहाय्यक ठाणेदार आर. वसुकार म्हणाले की, मुलीचे विवाहाचे वय कायद्याने 18 वर्षे ठरविले आहे. बालविवाह बेकायदेशीर असून समाजाने बालविवाह थांबवावे. असा प्रकार निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल.