स्वाभिमानीच्या हेल्पलाईन अ‍ॅपने रुग्णांची भटकंती थांबणार

    दिनांक :03-May-2021
|
- रविकांत तुपकरांचा पुढाकार
 
बुलडाणा,
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय आणि शासन मान्य कोविड केंद्र रूग्णसंख्येने भरले आहेत. यामुळे अनेक गंभीर रुग्णांना बेड मिळत नाही. परिणामी वेळेत उपचार होत नसल्याने रुग्ण दगावत आहे. आपल्या रुग्णाचा जीव वाचवा म्हणून नातेवाईक जीवाचे रान करत आहेत. या दवाखान्यातून त्या दवाखान्यात अशी भटकंती करूनही खाट मिळणे दुरापास्त झाले आहे. ही परिस्थिती पाहता वेळेत औषधोपचार मिळून रुग्णांचा जीव वाचावा, खाट मिळविण्यासाठी कुणाचीच परवड होऊ नये याकरिता बसल्या ठिकाणी जिल्हाभरातील कोविड काळजी केंद्रामधील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरने ‘ग्रोवसरी अ‍ॅप’ तयार केले आहे. या माध्यमातून रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत तर होईलच, पण त्याचा लाखमोलाचा जीव वाचविणे शक्य होईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
gfgf_1  H x W:
 
सध्या प्रायोगिक तत्वावर हे अ‍ॅप बुलडाणा शहरापुरते मर्यादित असून लवकरच त्याचा जिल्हाभर विस्तार करण्यात येईल असे सांगत रविकांत तुपकर म्हणाले, सध्या कोरोनाची भयावह स्थिती उद्भवली आहे. रोज हजारावर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. गंभीर रुग्ण आपल्या नातेवाईकांसमोर दगावत आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधीला जागा उरली नाही, असे हृदय पिळवटून टाकणारे चित्र आपल्या अवतीभवती पाहायला मिळत आहे. कोरोना हा सर्वांच्या अग्नी परीक्षेचा काळ आहे. जिवाभावाची, नात्यागोत्याची , आपुलकीची माणसं जगाचा निरोप घेताहेत.
 
 
आपण डॉक्टर नाही, रुग्णांवर उपचार करू शकत नाही. पण काही क्षणाचा विलंब झाला तर रुग्णाचा मृत्यू होतो. मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णाला दवाखान्यात जागा मिळाली नाही तर तो निश्चितच प्राण सोडतो. जिल्ह्यात दररोज असंख्य रुग्णांची बेडसाठी दवाखान्यांच्या शोधात भटकंती होते. कोणत्या कोविड सेंटर मध्ये किती बेड आहेत, आय.सी.यु, ऑक्सिजन बेडची सद्यस्थिती कशी आहे, याची माहिती प्रत्येकाच्या मोबाईलवर किंवा संगणकावर उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रोवसरी अ‍ॅप जनतेला समर्पित करीत असल्याचे तुपकर यांनी सांगितले. सामाजिक भान आणि नैतिक जबाबदारी ओळखून आपण जनसेवेसाठी कामी यावे, एवढाच निर्मळ हेतू यामागचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.