बाधितांमधील घट समाजमनाला उभारी देणारी

    दिनांक :03-May-2021
|
- नव्याने बाधित ४९८७
- कोरोनामुक्त ६६०१
- एकूण मृत्यू ७६

नागपूर,
मागील काही दिवसांच्या तुलनेत नव्या बाधितांच्या संख्येत ४९८७ एवढी कमालीची घसरण झाली. त्यापेक्षा जास्त ६६०१ कोरोनामुक्त झाले. ही बाब अडीच महिन्यात वाढलेल्या कोरोनाच्या प्रकोपात समाजमनाला उभारी देणारी ठरली. नकारात्मक ७५.२८ टक्के नमुन्यांनीसुद्धा या आनंदात भरच टाकली. नव्या बाधितांपेक्षा १६१४ने जास्त रुग्ण बरे झाले. ६६०१ कोरोनामुक्तांमध्ये ग्रामीणमधील २००५ व शहरातील ४५९६ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ लाख ४४ हजार २४५ कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात गृहविलगिकरणातील १ लाख ९१ हजार १४६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्तीचे आजचे प्रमाण ८१.१२ टक्के आहे.

ggetet_1  H x W
मागील २४ तासात नागपूर जिल्ह्यात एकूण २०१७८ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. त्यात सर्वाधिक खाजगी प्रयोगशाळांत ९५२१, अँटिजेन पद्धतीने १९००, रातुम नागपूर विद्यापीठ प्रयोगशाळेत ३९८, नीरी प्रयोगशाळेत १२६, मेयो प्रयोगशाळेत १४६९, मेडिकल प्रयोगशाळेत ११०४, एम्स प्रयोगशाळेत ६७३, असे एकूण १५१९१ म्हणजे ७५.२८ टक्के रुग्णांचे नमुने नकारात्मक ठरणे आनंद देणारे आहे. फक्त ४९८७ रुग्णांचे नमुने सकारात्मक आले. ग्रामीणमध्ये १६, शहरात ४८ तसेच जिल्ह्याबाहेरील १२, अशा ७६ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण ७६७५ बाधितांच्या मृत्यूची संख्या झाली. बाधित दर १.१९ टक्के तसेच मृत्यू दर १.८१ टक्के आहे. आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू १० एप्रिलला ११३ झाले. या तुलनेत ७६ कमी असले तरी मृत्यू शून्यावर येतील तीच चांगली परिस्थिती.
मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रकोप वाढायला लागला. मागील वर्षी सप्टेंबरने इतिहास घडवला होता. त्यास नंतर मार्चने आणि एप्रिलनेसुद्धा मागे टाकले. सर्वाधिक ७९९९ बाधितांची नोंद २३ एप्रिलला झाली. ती कमी होत ४९८७ झाली. कोरोनाची रोजची स्थिती पाहण्यासाठी लोक आतुरलेले, आसुसलेले असतात. ही कमी झालेली संख्या त्यांना सुखावून गेली. समाजमाध्यमांवर चर्चेला उधाण आले होते. घरोघरी, गटा-गटात, कार्यालयात फक्त याचीच चर्चा होती.
टाळेबंदीचे पालन प्रामाणिकतेने व्हावे
मनाला दिलासा देणारा हा आकडा आहे. अर्थात तो आणखी बराच कमी व्हायला हवा. लोक जागरुक, सावध झाले आहेत. प्रतिबंधात्मक काळजी घेत आहेत. त्याचा हा परिणाम आहे. असे असले तरी कोरोना संपलेला नाही. आणखी अधिक काळजी घ्यायला हवी. प्रतिबंधात्मक उपायांचे कडक पालन व्हावे. संसर्ग तोडण्यासाठी सध्याची टाळेबंदी योग्य असून त्याचे पालन नागरिकांनी अधिक कठोरतेने व प्रामाणिकतेने करायला हवे. थोडा त्रास सहन करा, पण घराबाहेर शक्यतो पडूच नये, असे मत अ‍ॅड्. लुबेश मेश्राम यांनी व्यक्त केले.