वादळामुळे दुष्काळात तेरावा महिना

    दिनांक :03-May-2021
|
- धान व आंब्याचे नुकसान
भंडारा, 
आधीच कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकरी संकटात सापडला असताना दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादळ, वारा, पावसाने धान व आमराईचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांकडून दुष्काळात तेरावा महिना आल्याचे बोलले जात आहे.
 
fhdv_1  H x W:
 
यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य नागरिक संकटात असताना शेतकऱ्यांने कंबर कसून संकटातही उन्हाळी धानाची शेती कसली. मागील हंगामातील विक्री केलेल्या धानाचे चुकारे, बोनसची रक्कम अद्याप मिळाली नसताना अधारवाडी करून व कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, किटकनाशकांची खरेदी केली. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने टाळेबंदीमुळे कुणीही घराबाहेर पडण्यास घाबरत असताना मजूरांचीही वाणवा झाली. तरीही शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उन्हाळी धान लागवड केली.
 
 
कृषी पंपाला केवळ आठ तासाचा रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होत असल्याने रात्ररात्र जागून शेतीला सिंचन केले. केलेल्या मेहनतीचे फळ आता दिसू लागले होते. अनेकांचे पीक कापणीला आले असताना दोन दिवसापासून जिल्ह्यात वादळी वारा व पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतातील उभे पीक झोपले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात टपोऱ्या पावसाच्या सरी कोसळल्याने धानासह आम्रवृक्षांनाही याचा फटका बसला. यंदा मोठ्या प्रमाणात बहरलेला आंबा गळून पडत आहे. तर बाजारपेठ बंद असल्याने आंबा विक्रीची सोय न झाल्याने नुकसान सहन करावे लागत आहे.
 
 
एकीकडे कोरोनामुळे टाळेबंदी लावण्यात आल्याने शहराकडे मजूरीसाठी गेलेली शेतकऱ्यांची मुले गावाकडे परत आले आहेत. त्यांना गावात कोणतेच काम नाही. शिवाय रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात असताना वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे हाती येणारे धानपीक भुईसपाट करीत आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंबाकडून दुष्काळात तेरावा महिना आल्याचे बोलले जात आहे.

धान कवडीमोल भावाने विकावा लागणार काय?
लाखांदूर : तालुक्यात अचानक 1 मे रोजी रात्री सुमारास वादळी वाऱ्यासहगारपीट झाली. यानंतर 2 व 3 रोजीही सायंकाळपासून वादळला सुरूवात झाली. यामुळे उन्हाळी धानपीक व आंब्यासह अनेक भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तालुक्यात उन्हाळी धान पीक जोमात असल्यामुळे अचानक आलेल्या गारपीटचा मोठा फटाका बसल्यामुळे यंदाही धान कवडीमोल भावाने विकावा लागणार काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. हातचे पीक गेल्याने पुर्णतः चिंताग्रस्त झाला आहे.