बंद करा कॅमेरा....मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर

    दिनांक :03-May-2021
|
'प्रेस फ्रिडम डे'च्या वृत्तवाहिनीचा कॅमेरा हिसकला
अकोला,
बंद करा कॅमेरा असे म्हणत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश सोनोने यांचा कॅमेरा हिसकवत आज दादागिरी केली. असा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. पत्रकार परिषदेला उशीरा आलेल्या मंत्र्यांना पत्रकार परिषद आयोजित केल्याची माहिती देखील नव्हती. असा कांगावा मंत्र्यांनी केला. दरम्यान, अकोल्यातील सर्व पत्रकारांनी मंत्र्यांच्या दादागिरी व कॅमेरा हिसकावण्याच्या कृतीचा निषेध करत पत्रकार परिषद उधळून लावली.
 

mati_1  H x W:  
 
अकोला बदनाम आहे.अकोल्यात अधिकारी येत नाही. असे बोल बोलत आज राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी अकोलेकरांनाच खडे बोल सुनावले. जिल्हा माहिती अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दू.12.30 वाजता महिला व बाल विकास मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार सर्व पत्रकार उपस्थित झाले. तत्पुर्वी तिथे महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी विविध विभागांची बैठक घेतली. या बैठकीपासून पत्रकारांना दूर ठेवण्यात आले होते. मंत्र्यांनी बैठकीत पत्रकारांना दूर का ठेवले असा आपसूक प्रश्न पत्रकारांना पडला होता. त्यात साडेबाराची पत्रकार परिषद 1.15 वाजेपर्यंत सुरु न झाल्याने पत्रकारांनी काढता पाय घेतला. तितक्यात अ‍ॅड.यशोमती ठाकूर या बाहेर येत त्यांनी पत्रकारांशी संवाद सुरु केला. त्यांच्या सर्व संवादाचे चित्रीकरण टिव्ही 9 चे जिल्हा प्रतिनिधी गणेश सोनोने करत होते.
 
 
 
अ‍ॅड.ठाकूर यांना कशाचा राग आला त्यांनी बंद करा कॅमेरा असे म्हणत तो हिसकावला. त्यानंतर सर्वच पत्रकारांनी त्यांच्या या कृतीचा निषेध केला. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी पत्रकारांनी गैरसमज करु नये अशी आर्जव केली. आज जागतिक प्रेस फ्रिडम डे असताना पत्रकारांच्या स्वातंत्र्यांवर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी दादागिरी करत कॅमेरा बंद करण्याचा आदेश देणे, तो हिसकावण्याची कृती करण्याचा निषेध सर्वत्र पत्रकार संघटनांनी केला. सर्व पत्रकारांनी एकमताने राज्याच्या महिला व बाल विकास मंत्र्यांची पत्रकार परिषद उधळून लावली. कुणीच पत्रकार परिषदेला थांबले नाही. अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांना चित्रीकरणाचा इतका का राग आला. त्याच बरोबर मंत्र्यांच्या परवानगीनंतरच जिल्हा माहिती कार्यालय पत्रकार परिषदेचा वेळ निश्चित करत असताना ती वेळ न पाळणे, उशीर झाल्यावर मंत्र्यांची पत्रकारांवर दादागिरी का असा प्रश्न आज अनेक ज्येष्ठ पत्रकारांना अकोल्यात पडला होता.