यशवंत सोळंके यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मान

    दिनांक :03-May-2021
|
- अपर पोलिस अधीक्षक सोळंके यांच्या गुणवत्तापूर्ण सेवा
मानोरा,
राज्य पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या सातसे नव्यानव अधिकारी आणि अंमलदारांना महाराष्ट्र दिनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस महासंचालक सन्मान पदके जाहीर करण्यात आली आहे. यात मानोरा तालुक्याचे सुपूत्र असलेल्या आणि वर्धा येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले यशवंत सोळंके या अधिकार्‍यांचाही समावेश आहे. कारखेडा ता. मानोरा येथील मूळ रहिवासी असलेले आणि वर्धा येथे अपर जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत यशवंत सोळंके यांच्यासह राज्यातील विविध विभागातील पंधरा पोलिस अधिकार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यशवंतराव सोळंके यांनी आपल्या सेवे दरम्यान भंडारा,सिंदखेड राजा, भोकर, अमरावती येथे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्याच्या पोलिस महासंचालकांनी हे मानाचे पदक देऊन अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सोळंके आणि मानोरा तालुक्याचाही या निमित्ताने गौरव केलेला आहे.
 
 
shim _1  H x W:
 
पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण व उत्तम सेवा, उल्लेखनीय आणि शौर्यपूर्ण कामगिरीसाठी हे पदक जाहीर करण्यात येते. राज्य पोलिस सेवेत असताना पंधरा वर्षे उत्तम सेवाभिलेख, क्लिष्ट आणि बहुचर्चित थरारक गुन्ह्यांची उकल करून दोषींविरुद्ध ठोस पुरावे जमा करणे, नैसर्गिक आपत्तीच्यावेळी केलेले सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या पोलिसांसह वीस वर्षे विनाअपघात उत्तम सेवाभिलेख, राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य दाखविणे, विशेष शाखेत उत्तम कामगिरी आणि प्रशंसनीय स्वरूपाचे अन्य अत्युत्तम काम केल्याबद्दल अधिकारी आणि अंमलदारांनाही गौरविण्यात येणार आहे. राज्यातील तब्बल 799 अधिकारी आणि अंमलदार यांचा अशाप्रकारे पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.