परतवाड्यात युवकाची धारदार शस्त्राने हत्या

    दिनांक :03-May-2021
|
- पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात

अचलपूर, 
परतवाडा शहरातील रवी नगर छोटा बाजार परिसरात सोमवारी 3 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने विक्की देविदास पवार या युवकावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी अतिरिक्त पोलिस कुमक जुळ्या शहरात तैनात केली आहे.
 
ddhgf_1  H x W:
 
 
प्राप्त माहितीनुसार, परतवाडा पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असता विक्की पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. विक्की नगर पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सोमवारी 4 वाजताच्या सुमारास तो एमएच 27 बीएम 6330 क्रमांकाच्या दुचाकीने सदर बाजारातून जात असताना फईम जनरल स्टोअर्सच्या समोर अज्ञात हल्लेखोरांनी विक्कीच्या गळ्यावर, पोटावर, मांडीवर धारदार शस्त्राने वार केले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
 
 
पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी व अन्य जप्त केले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासणे सुरू केले आहे. हत्येच्या अनुषंगाने शहरातील वातावरण तणावपूर्ण होऊ नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावली आहे. मृतकास एक वर्षाची मुलगी आहे. ठाणेदार सदानंद मानकर यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. हत्येच्या पाठीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.