कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक देणे-घेणे गुन्हा

    दिनांक :04-May-2021
|
- महिला आणि बालविकास विभागाचा इशारा
मुंबई, 
कोरोनामुळे पालक गमवावे लागलेल्या बालकांना दत्तक देणे आणि घेणे हा गुन्हा असून, हे बेकायदेशीर कृत्य केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आणि बालविकास विभागाने दिला आहे. बेकायदेशीररीत्या बालकांना दत्तक घेणे किंवा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहे.
 
maha_1  H x W:
 
अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास 1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा किंवा 8329041531 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महिला आणि बालविकास आयुक्तालयाने केले आहे. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून, त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाने कळवले आहे. कोरोना परिस्थितीत बालकांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोरोनामुळे पालकांच्या मृत्युमुळे मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा नातेवाईकांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.