उन्हाळी धान खरेदीवर अनिश्चिततेचे ढग

    दिनांक :04-May-2021
|
- धान ठेवायचे कुठे; यंत्रणेला पडला प्रश्न
तभा वृत्तसेवा
गोंदिया,  
जिल्हा पणन कार्यालय आणि आदिवासी विकास महामंडळाने मागील खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. त्यामुळे गोदामे भरून असल्याने उन्हाळी हंगामातील धान खरेदी करायची कशी? असा प्रश्न वरील दोन्ही विभागांसमोर निर्माण झाला असून अनिश्चिततेचे ढग निर्माण झाले आहे. जिल्हा पणन कार्यालय व आदिवासी विकास महामंडळाद्वारे मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात केंद्रशासनाच्या हमीभावाने धान खरेदी सुरू आहे. खरीप हंगामातील धानाची खरेदी नोव्हेंबर तर भरडाईसाठी उचल डिसेंबरपासून होत होती.
 
 
nb_1  H x W: 0
 
उप अभिकर्ता संस्थांनी खरेदी केलेला धान हा गोदामांमध्येच साठवण करण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. त्या अनुषंगाने यावर्षी संस्थांनी खरेदी केलेला धान गोदामांमध्येच पडला आहे. गोंदिया जिल्ह्यातील काही संस्थांनी गोदामे पूर्ण भरल्यानंतर खुल्या जागेत धानाची खरेदी केलेली आहे. मात्र, अद्यापही या धानाची भरडाईसाठी उचल झाली नसल्याने उन्हाळी हंगामातील धान खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मागील हंगामापर्यंत खरीपातील धानाची उचल वेळेवर व्हायची. उन्हाळी हंगामातील धान खरेदीसाठी गोदामे नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सुद्धा आता धानाची विक्री करण्याची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे शासन यावर काय तोडगा काढते याकडे उन्हाळी धान उत्पादकांचे लक्ष लागले आहे.