कोरोनाचा प्रसार मंदावल्याचे तज्ज्ञांनी नाकारले

    दिनांक :04-May-2021
|
- राज्यात २१ मे ते १५ जूनदरम्यान प्रभाव घटणार 
 नवी दिल्ली,
केंद्र सरकारने सोमवारी दिल्ली आणि महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमधील रुग्णसंख्या स्थिरावली असल्याचे प्राथमिक संकेत मिळत असल्याचे म्हटले आहे. संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे सरकाने स्पष्ट केले आहे. मात्र या विषयातील तज्ज्ञांनी कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक हा १५ जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय आरोग्य विषयक तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची सध्या शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रामधील कोरोना लाटेसंदर्भात बोलताना टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर शाशांक जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाची दुसरी लाट मुंबईतून ओसरल्याची चिन्ह दिसत असली तरी त्याचा प्रभाव महाराष्ट्रात कमी होण्यास २१ मे ते १५ जूनदरम्यानचा कालावधी लागेल असे म्हटले होते. देशातील अनेक राज्यांमध्ये आता रुग्णसंख्या वाढत असतानाच एवढ्या घाईघाईत संसर्ग ओसरण्यास सुरुवात झाल्याचे म्हणणे चुकीचे ठरेल असे तज्ज्ञ सांगत आहेत.
  
corona _1  H x
अनेक ठिकाणी येणार तिसरी लाट
काही राज्यांमध्ये काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी अनेक राज्यांमध्ये ती वाढत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. लसीकरणाचा वेग मंदावला तर अनेक ठिकाणी तिसरी लाट येईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. तसेच अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मिझोरम, नागालॅण्ड, मेघालय, ओदिशा, पुद्दचेरी, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे.
 
  
रुग्णसंख्याचे प्रमाण कुठे किती?
एक लाखांहून अधिक उपाचराधीन रुग्ण असणाऱ्या राज्यांची संख्या १२ असल्याचंही अग्रवाल म्हणाले. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. तर ५० हजाराहून रुग्ण उपचाराधीन असणाऱ्या राज्यांची संख्या सात इतकी आहे. त्याचप्रमाणे १७ राज्यांमध्ये ५० हजारांहून कमी रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर सध्या करोनाचे उपचार सुरु आहेत. २२ राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. तर नऊ राज्यांमधील संसर्गाचं प्रमाण ५ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. पाच राज्यामध्ये संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांहून कमी असल्याचा खुलासा अग्रवाल यांनी केला आहे.