अनिल अंबानींच्या फेरफटक्यानंतर गोल्फ कोर्स बंद

    दिनांक :04-May-2021
|
महाबळेश्वर,
महाबळेश्वर येथील एका खाजगी क्लबमधील 11 होल-गोल्फ कोर्स मैदानावर अनिल अंबानी फेरफटका मारतानाची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर स्थानिक नागरी अधिकार्‍यांनी गोल्फ कोर्स बंद करण्याचा आदेश संबंधित क्लबला दिला आहे. अनिल अंबानींची ही चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रचंड प्रसारित झाली आहे.
 
maha_1  H x W:
 
अनिल अंबानी पत्नी टीना आणि मुलांसह महाबळेश्वरला गेले आहेत. राज्यात कठोर निर्बंध असतानाही ते येथील प्रसिद्ध होल-गोल्फ कोर्सवर सायंकाळी फिरत असताना दिसून आले. त्यांनतर महाबळेश्वर परिषदेच्या मुख्य अधिकारी पल्लवी पाटील यांनी संबंधित क्लबला नोटिस बजावली आहे. क्लबने सकाळी तसेच सायंकाळी लोकांच्या बाहेर फिरण्यावर बंदी घातली नाही, तर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता आणि साथीचे रोग अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. कुटुंबातील काही सदस्यांसह अनिल अंबानी यांची मैदानावर फिरतानाची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्याची सत्यता पडताळल्यानंतर संबंधित क्लबला नोटिस पाठवली असून, गोल्फ कोर्सवरील प्रवेश बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.