आयसीसी टी-20 क्रमवारीत भारत दुसर्‍या स्थानी

    दिनांक :04-May-2021
|
दुबई, 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सोमवारी जाहीर झालेल्या वार्षिक अद्ययावत आकडेवारीनुसार टी-20 क्रमवारीत भारताने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. मात्र, एकदिवसीय सामन्यांच्या श्रेणीत भारताची तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. टी-20 प्रकारात इंग्लंडची चमू (277 गुण) सर्वोच्च स्थानी आहे तर भारत त्यांच्यापेक्षा पाच गुणांनी मागे आहे. इंग्लंडची पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. तर ऑस्ट्रेलियाला 2-1 आणि दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने पराभूत केले होते. मात्र, इंग्लंडला भारताविरुद्ध 2-3 ने पराभूत व्हावे लागले होते.
 
natr_1  H x W:
 
न्यूझीलंडच्या संघाला टी-20 मध्ये वार्षिक अपडेटचा फायदा झाला असून संघ पाचव्या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडने या दरम्यान वेस्टइंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशला पराभूत केले. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसर्‍या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरला आहे. श्रीलंका आणि बांगला देश अनुक्रमे आठव्या व नवव्या स्थानी आहेत. तर वेस्टइंडिजची चमू 10 व्या क्रमांकावर आहे. आयसीनुसार या अद्ययावत आकडेवारीमुळे 2017-18 चे निकाल हटविण्यात आले आहेत. आणि 2019-20 मध्ये खेळविण्यात आलेले सामने आधारभूत मानण्यात आले आहेत. एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया आणि आता सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या न्यूझीलंडनंतर भारताची आता तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे.