लोकसहभागातून उभारले कोविड विलगीकरण केंद्र

    दिनांक :04-May-2021
|
बुलडाणा,  
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणची कोविड विलगीकरण केंद्रे भरली आहेत. गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत जर गावोगावीच विलगीकरण केंद्रे उभी राहिली तर कोरोनाला आळ बसू शकेल. दुसरीकडे शासकीय यंत्रणेवर यासाठी निर्भर राहून या प्रकियेला उशिर करण्यापेक्षा लोकसहभागातून विलगीकरण केंद्रे उभी करावीत तसेच एकजुटीतून व सामुहिक प्रयत्नांनी कोरोनाला हद्दपार करूया, अशा उद्दात हेतूने येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील किन्होळा गावात गावकर्‍यांनी जिल्ह्यातील पहिले कोविड विलगीकरण केंद्र उभारले आहे. लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या या विलगीकरण केंद्राचे जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी भरभरून कौतुक केले असून लोकसहभागातून कोविड विलगीकरण केंद्राचा किन्होळा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर राबविणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
 

gh _1  H x W: 0 
 
3 मे रोजी सकाळी 11 वाजता किन्होळा गावचे ज्येष्ठ नागरिक प्रभू काका बाहेकर यांच्या हस्ते विलगीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. विलगीकरण केंद्राचे मुख्य संकल्पक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे, शासकीय कोविड केंद्राचे प्रभारी डॉ.सचिन वासेकर, चिखली पोस्टे.चे ठाणेदार गुलाबराव वाघ, सरपंच अर्चना वसंत जाधव असे मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर उभारण्याचा उपक्रमाने मी भारावलो. गावकर्‍यांचे कौतुक करावे तेव्हढे कमी.’ जिल्हाधिकारी यांनी विलगीकरण केंद्राचे उद्घाटन स्वतःच्या हातून न करता किन्होळा गावातील ज्येष्ठ नागरिक प्रभू काका बाहेकर यांच्या हस्ते करून घेतले.
 
 
उपरोक्त मान्यवरांनी यावेळी संपूर्ण विलगीकरण केंद्राची पाहणी केली. त्या ठिकाणी असणार्‍या सुविधा, स्वच्छता आणि व्यवस्थेचे सर्वानीच कौतुक केले. जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया यांनी केंद्रावरील निटनेटकेपणाची विशेष प्रशंसा केली. आपल्या मार्गदर्शनात डॉ.सचिन वासेकर यांनी कोरोनाची भयावहता स्पष्ट केली. आजमितीस किन्होळा प्रमाणे जिल्हाभरातील मोठ्या गावांमध्ये आयसोलेशन सेंटर उभे करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी बोलून दाखविले. या सेंटरला सतत भेट देऊन रुग्णांवर उपचाराची हमीही डॉ.वासेकर यांनी दिली. यावेळी किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अनिल साळोख, डॉ.अनिल पांढरे, डॉ.आकाश सदावर्ते, डॉ.स्वप्नील अनाळकर, डॉ.श्रद्धा पाटील, डॉ.भाग्यश्री खेडेकर, डॉ.दिपाली महाजन, गावच्या उपसरपंच कल्पना राजपूत, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर, मधुकर बाहेकर मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होती.