कोविड केंद्रे, रुग्णालये झाले मृत्यूचे प्रवेशद्वार

    दिनांक :04-May-2021
|
- सोयी-सुविधा नावालाच
तभा वृत्तसेवा
गोंदिया,
जिल्ह्यात आज तारखेत तब्बल पाच हजाराहून अधिक कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण आहेत. याचा ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे. तर दुसरीकडे अपुर्‍या सुविधांमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. कोविड काळजी केंद्रांत मोठ्या प्रमाणात डॉक्टर व आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी आहेत. येथील शासकीय रुग्णालयातील तथा जिल्हा प्रशासनाद्वारे कार्यान्वीत कोविड काळजी केंद्रांत सुविधांच्या कमतरतेमुळे जणू मृत्यूचे प्रवेशद्वार झाल्याची प्रचिती अनेक रुग्ण व नातेवाईकांना आलेल्या अनुभवावरून दिसून येते. सर्वसामान्य जनतेमध्ये शासकीय आरोग्य सेवेची प्रतिमा फारशी चांगली नाही. अनेकदा सोयी-सुविधा व योग्य उपचार रुग्णांवर होत नसल्याने कुटुंबिय, नातेवाईकांचा संताप अनावर होऊन डॉक्टर, आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
 

h_1  H x W: 0 x 
 
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता विशेष कोरोना रुग्णालय व कोविड काळजी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यात एकट्या गोंदिया शहराचा विचार केल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 220, केटीएस जिल्हा रुग्णालयात 120, कोविड रुग्णालय (एमएसआयू) 50, मुर्री येथील आदीवासी मुलांच्या वसतीगृहात 130, जिल्हा क्रीडा संकूल 95, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 150 खाटांचे कोविड रुग्णालयांचा समावेश आहे. अनेक कल्याणकारी योजनांना कात्री लावून, वेळप्रसंगी त्या बंद करून जनतेच्या पैश्यातुन कोट्यवधी रुपये खर्च करून कोविड रुग्णालयांची सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र यात आवश्यक त्या सोयी-सुविधा किती उपलब्ध आहेत हा संशोधनाचा विषय आहे. काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरली. यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला होता. यावेळी सर्व आरोग्य यंत्रणा व प्रशासन सैरवैर झाल्याचे चित्र होते.
 
 
या कोविड केंद्रे व रुग्णालयांमध्ये प्राणवायू, जीवनरक्षक प्रणाली, रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुडवडा व त्याचा काळाबाजार, आवश्यक औषधांची कमतरता पहावयास मिळाली. यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या-त्यांच्या स्तरावर प्रयत्न करून प्राणवायू, व्हेंटीलेटर्स, रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून स्वतःची पाठ थोपटून घेतली. लोकप्रतिनिधी आणि शासन-प्रशासनाला ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्या’ची सद्बुद्धी सूचते. वर्षभरापासून कोरोनाची साथ सुरू असताना शासनाला सोयी-सुविधांविषयी का सूचले नाही? असा प्रश्न देखील जनतेने उपस्थित केला आहे. पुर्वीच आरोग्य यंत्रणा सक्षम केली असती तर आज शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यास यश आले असते. एवढे सर्व होऊन आरोग्य यंत्रणा जागी झाल्याचे दिसून येत नाही. या केाविड केंद्रांमध्ये वेळेवर उपचार होत नसल्याने व आवश्यक सोयी, औषधांची कमतरता असल्याने येथे दाखल रुग्णांना प्राण गमवण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने आतातरी या कोरोनाच्या बिकट परिस्थितीतुन धडा घ्यावा व आवश्यक सुविधा, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, यंत्रसामुग्री उपलब्ध करावी, अशी मापक अपेक्षा सर्वसामान्य जनता बाळगून आहे.