विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या निर्धाराने खेळणार मुंबई

    दिनांक :04-May-2021
|
आजचा सामना
मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद
- स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
- वेळ : संध्याकाळी 7.30 वाजतापासून
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्वर
नवी दिल्ली,
सलग दोन विजयांसह सूर गवसलेला गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ मंगळवारी येथील इंडियन प्रीमियर लीग सामन्यात अंतिम स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादला पराभूत करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. मुंबईने आपल्या मागील सामन्यात कीरोन पोलार्डच्या झंझावाती खेळाच्या बळावर फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला 4 गड्यांनी पराभूत केले. दुसरीकडे सनरायझर्स हैदरादराबादला राजस्थान रॉयल्सविरुद्ध 55 धावांनी लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला. वर्तमान सत्रात हैदराबादचा सात सामन्यातील हा सहावा पराभव आहे. संघ परिवर्तनाच्या काळातून मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळेच खराब फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर हटवून केन विलियमसनकडे ते पद सोपविण्यात आले.
 
sport_1  H x W:
 
मुंबईचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा (250 धावा) आणि क्विंटन डिकॉक (155 धावा) पुन्हा एकदा पाचवेळच्या विजेत्या चमूला चांगली सुरुवात करून देण्याबरोबरच मोठी धावसंख्या उभारण्याच्या निर्धाराने खेळतील, हे स्पष्ट आहे. मुंबईची आक्रमक मध्यम फळी गेल्या दोन सामन्यात दर्जेदार कामगिरी नोंदविण्यात यशस्वी ठरली ही संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब आहे. चेन्नईविरुद्ध 34 चेंडूत नाबाद 87 धावांची सामना जिंकवून देणारी खेळी करणारा पोलार्ड (168 धावा) आपला फॉर्म कायम ठेवण्यासाठी उतरेल. कृणाल पांड्या (100 धावा), हार्दिक पंड्या (52 धावा) आणि सूर्यकुमार यादव (173 धावा) विरुद्ध संघाची गोलंदाजी फोडून काढण्यास सक्षम आहेत. ते उद्याही एकजूट होऊन दणकेबाज खेळी करण्याचा प्रयत्न करतील. मुंबई संघ जेम्स नीशामऐवजी ईशान किशन आणि जयंत यादवपैकी एकाला संधी देतो अथवा नाही हे देखील पाहावे लागेल. नीशामने मोठी धावसंख्याही उभारलेली नाही आणि त्याने बळी देखील मिळविलेले नाहीत.
 
 
चेन्नईविरुद्ध केलेली खराब कामगिरी विसरून मुंबईच्या गोलंदाजांना उद्या नव्याने सुरुवात करावी लागेल. जसप्रीत बुमराह (सहा गडी) आणि ट्रेंट बोल्ट (आठ गडी) यांनी हाणामारीच्या षटकांत (डेथ ओव्हर्स) शानदार गोलंदाजी केली आहे आणि सनरायझर्सच्या फलंदाजांना त्रस्त करण्यास ते सक्षम आहेत. फिरकी गोलंदाज राहुल चाहर (11 गडी) मुंबईचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. मात्र, त्याला कृणालच्या सहकार्याची गरज आहे. कृणालने आतापर्यंत केवळ तीन गडी बाद केले आहेत. पोलार्डने देखील गेल्यावेळच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बळी मिळविले होते. त्यामुळे तो पाचवा अथवा सहावा गोलंदाज म्हणून योगदान देऊ शकतो. दुसरीकडे सनरायझर्सच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. हा संघ आपला सर्वोत्कृष्ट फलंदाज जॉनी बेयरस्टो (248 धावा) वर सर्वाधिक अवलंबून आहे. मात्र, मध्यम फळीतील खेळाडूंनी बहुतांश वेळी संघाला निराश केले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाने वॉर्नरला बाहेर ठेवून मनीष पांडे आणि बेयरस्टोला डावाचा प्रारंभ करण्याची संधी दिली. तर विलियमसन तिसर्‍या क्रमांकावर आला. हैदराबादने जर हाच क्रम कायम ठेवला तर या तिघांना उद्याच्या सामन्यात व त्यानंतरही मोठी धावसंख्या उभारावी लागेल. विजय शंकर (58 धावा), केदार जाधव (40 धावा), अब्दुल समद (36 धावा) आणि मोहम्मद नबी (31 धावा) यांना देखील योगदान द्यावे लागेल. फिरकीपटू राशिद खान 10 गडी बाद करण्यासह संघाचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. मात्र, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (तीन गडी) आणि खलील अहमद (चार गडी) यांनी अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही. संदीप शर्माला दुसर्‍यांदा संधी मिळते अथवा पुन्हा सिद्धार्थ कौलला उतरविण्यात येते हे देखील पाहावे लागेल.
 
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), अ‍ॅडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स नीशाम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जेनसन, मोहसिन खान, नाथन कोल्टर नाईल, पीयूष चावला, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि युद्धवीर सिंह.
 
सनरायजर्स हैदराबाद :
केन विलियमसन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, रिद्धिमान साहा, प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंह, जेसन होल्डर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बासिल थम्पी, जगदीश सुचित, केदार जाधव आणि मुजीब उर रहमान।