श्रीलंकेचा थिसारा परेरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

    दिनांक :04-May-2021
|
कोलंबो,
श्रीलंकेचा ख्यातनाम अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 32 वर्षीय थिसारा परेराने निवृत्तीची माहिती श्रीलंका क्रिकेट संघाला (एसएलसी) दिल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीलंका क्रिकेटचे निवडकर्ते थिसारा परेरासह अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंना एकदिवसीय संघातून वगळणार असल्याचे वृत्त होते. या चर्चेनंतर परेराने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र तो फ्रेंचायझी क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे.
 
nspo_1  H x W:
 
सहा चेंडूत सहा षटकार
थिसारा परेराने काही दिवसांपूर्वी, एका स्थानिक सामन्यात सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. परेराने आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना ब्लूमफिल्ड विरुद्ध ऐतिहासिक खेळी खेळली होती. एका षटकात सहा षटकार मारणारा परेरा हा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला. तसेच, तो जगातील नववा आणि 50 षटकांच्या सामन्यात सलग सहा षटकार ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. भारताने जिंकलेल्या 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात परेराने फलंदाजी करताना 10 चेंडूत 22 धावा ठोकल्या होत्या. याच सामन्यात त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला 97 धावांवर बाद केले होते.
 
 
कारकीर्द
2009 मध्ये पदार्पण केल्यानंतर परेराने श्रीलंका संघाकडून सहा कसोटी, 166 एकदिवसीय आणि 84 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने सहा कसोटी सामन्यांमध्ये 203 धावा केल्या आणि 11 बळी घेतले. त्याचबरोबर 166 एकदिवसीय सामन्यात त्याने 2338 धावा आणि 175 बळी घेतले. 84 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात परेराने 1204 धावा आणि 51 बळी घेतले. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने एक एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे.