अनुष्काने मानले आभार

    दिनांक :04-May-2021
|
मुंबई,
अनुष्का शर्माचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. अनेक यशस्वी चित्रपटांची नायिका असल्यामुळे तिचा देश आणि परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून तिच्यावर असंख्य शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा पाऊसच पडला. त्यामुळे अर्थातच तिला आनंद झाला आहे. तिने सगळ्यांचे आभार मानले आहेत. मात्र यंदा हा दिवस साजरा करण्याची आपली इच्छा नव्हती असेही तिने म्हटले आहे.देशात करोनाचे महासंकट आहे. सगळीकडे एक भकास आणि भीतिदायक वातावरण आहे. अनेक लोकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते आहे.
 
 
anu _1  H x W:
 
आपले घर कसे चालवायचे याची अनेकांना विवंचना आहे, तर दोन वेळच्या जेवणाचीही अनेकांना भ्रांत आहे. अशा स्थितीत आपल्याला वाढदिवस साजरा करावासा वाटत नसल्याचे तिने नमूद केले आहे. मात्र आपल्या देशातल्या लोकांसाठी काहीतरी मदत करण्याची तिची इच्छा असून, ती व तिचा पती विराट कोहली यावर काम करत आहेत. नक्की काय आणि कसे करायचे याची रूपरेषा ते ठरवत असून लवकरच ते जाहीर करून आपण मदतकार्याला सुरुवात करणार असल्याचा इरादा तिने बोलवून दाखवला आहे. करोनाच्या या काळात अनेक सेलिब्रिटी सर्वसामान्यांची मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यात आता विराट-अनुष्का या स्टार कपलची भर पडली तर चांगलेच होणार आहे.