बोलिव्हियाच्या संसदेत खासदारांची हाणामारी

    दिनांक :10-Jun-2021
|
- महिला खासदारही भिडल्या
 
ला पाज, 
दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियाच्या संसदेत खासदारांची आपसात जोरदार हाणामारी झाली. माजी अंतरिम राष्ट्राध्यक्ष जीनिन एनेज यांना झालेल्या अटकेवरून संसदेत चर्चा सुरू होती. आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण तापले आणि सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत पुरुष खासदारांसह महिला खासदारांचाही समावेश होता. अखेर दोन्ही बाजूकडील वरिष्ठ नेते आणि सुरक्षा जवानांनी हस्तक्षेप करीत हाणामारी थांबवली.
 
 
boliv_1  H x W:
 
बोलिव्हियाच्या संसदेत जीनिन एनेज यांच्या अटकेवरून चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते हेन्री मोंटेरो आणि सत्ताधारी समाजवादी एमएएस पक्षाचे सदस्य अँटोनियो कोलके यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या दोन्ही नेत्यांमधील वाद वाढला आणि दोघेही सभागृहाच्या मध्यभागी आले. त्यानंतर हाणामारी सुरू झाली.
 
 
दोन्ही नेत्यांची सभागृहात हाणामारी सुरू असताना अन्य खासदारही दाखल झाले. त्यांच्यातील हाणामारी थांबवल्यानंतर इतर खासदारांमध्ये भांडणे सुरू झाली. त्यातच महिला खासदारांनीही हाणामारी करण्यास सुरुवात केली. या हाणामारीची चित्रफीत प्रसारित झाली आहे. जीनिन एनेज यांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. विरोधी पक्षांनी त्यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती.