लस साठवण्याबाबतची माहिती सार्वजनिक करू नका

    दिनांक :10-Jun-2021
|
- केंद्रांची राज्यांना सूचना
 
नवी दिल्ली, 
देशात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. मात्र, लस साठवण्याबाबतची काही संवेदनशील माहिती सार्वजनिक होत असल्याने त्यावरून वाद निर्माण होत आहेत. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लस साठवण्याबाबतची आणि स्टोरेजच्या तापमानाबाबतची माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर करू नये, तिचा वापर केवळ याबाबतच्या सुधारणांसाठी केला जावा, अशी सूचना एका पत्राद्वारे केली आहे.
 
 
covid 3_1  H x
 
लस साठवण्यासाठी ती विशिष्ट तापमानात ठेवावी लागते. या संदर्भातील माहिती इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजेंस नेटवर्कवर (इव्हीआयएन) साठवली जाते. ही माहिती संवेदनशील असल्याने ती सार्वजनिक करू नये, असे केंद्राने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक‘माच्या सहकार्याने (यूएनडीपी) केंद्राने यूआयपीअंतर्गत इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजेंस नेटवर्क प्रणाली सुरू केली आहे. याचा उपयोग राष्ट्रीय स्तरापासून ते उपजिल्हास्तरापर्यंत लसींच्या साठ्याची स्थिती आणि तापमान यावर देखरेख ठेवण्यासाठी केला जातो.
 
 
सर्व राज्ये दररोज लशींचा साठा आणि वापर याबाबतची माहिती अपडेट करण्यासाठी या प्रणालीचा वापर करीत असल्याबद्दल केंद्राने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, लसींचा साठा आणि तापमानाशी संबंधित सर्व डेटा आणि विश्लेषण यावर आरोग्य मंत्रालयाचा अधिकार आहे. मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही संस्था, माध्यमांना ती ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने देऊ नये, अशी सक्त ताकीद केंद्राने दिली आहे. ही अत्यंत संवेदनशील माहिती असून, तिचा वापर केवळ लसीकरण कार्यक‘मात सुधारणा करण्यासाठी केला पाहिजे, असे प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमाचे सल्लागार प्रदीप हलदर यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या सर्व संचालकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.