मुंबईतील डॉप्लर रडार 7 दिवसांत कार्यान्वित

    दिनांक :10-Jun-2021
|
- हवामान विभागाची माहिती
 
मुंबई, 
मुंबईतील हवामान विभागाचे बंद असलेले डॉप्लर रडार पुढील 7 दिवसांत कार्यान्वित होणार असून, अभियंते जुन्या रडारवर काम करीत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहोपात्रा म्हणाले, हवामान अभ्यासक आणि सर्वांसाठी हे रडार पुढील 7 दिवसांनंतर उपलब्ध होणार आहे. डॉप्लर रडार जरी बंद असले, तरी मुंबईतील 60 ठिकाणांवरील पावसाच्या नोंदी आणि अचूक अंदाज देत आहे. जुन्या रडारच्या दुरुस्तीबरोबरच नवे सी-1 रडारदेखील लवकरच कार्यान्वित होणार आहे.
 
 
Doppler radar_1 &nbs
 
कोणत्या ढगांमध्ये पाणी आहे, कोणत्या ढगांमध्ये बाष्प आहे तसेच ढगांची दिशा काय आहे? त्या ढगांमुळे परिसरात पावसाची तीव‘ता कशी असेल आणि किती मिमी पाऊस प्रती तास कोसळू शकतो याचा अंदाज डॉप्लर रडारच्या माध्यमातून घेण्यात येतो. मात्र, रडार कार्यान्वित नसल्याने बुधवारच्या पावसाचा अचूक अंदाज 4-6 तास आधी बांधण्यास अडचणी आल्या. पाऊस सुरू झाल्यानंतर मुंबईतील ऑरेंज अलर्ट, रेडमध्ये बदलण्यात आला. मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा जोर पुढील चार-पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड येथे अतिवृष्टीची शक्यता असल्याने 13 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट म्हणजे सावधानतेचा इशारा कायम आहे.