पावसाकडून सुख, समृद्धीची अपेक्षा!

    दिनांक :10-Jun-2021
|
उन्हाळा प्रखर झाला आणि गर्मीचे प्रमाण वाढले की आपसूकच पावसाळ्याची आठवण येऊ लागते. कारण अधिक तापत्या उन्हात ना कुलर काम करत, ना वातानुकूलित यंत्राच्या हवेत राहणे प्रकृतीच्या दृष्टीने योग्य ठरते. उन्हाळ्यामुळे नदी-नाले, पाणवठे आटतात, जंगले कोरडी शुष्क पडतात, झाडांची पाने सुकतात, विहिरींचे पाणीही आटते आणि शहरे तसेच गावांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागतो. जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण होतो. कारखान्यांची पाण्याची मागणी पूर्ण करणे राज्यकत्यांना अवघड होऊन बसते. राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, औरंगाबाद, नाशिक, मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भाचे तापमान अधिक असते. त्यामुळेही येथे लोकं पावसाळ्याची चातकासारखी वाट बघत असतात. जगातील विविध ठिकाणी पावसाळ्याचे वैशिष्ट्य आणि त्याचप्रमाणे पर्जन्यमानाचे प्रमाणही वेगळे आहे. काही देशात केवळ एकदाच पावसाळा असतो तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. भारतात मात्र उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तिन्ही ऋतू एकसारखे येतात आणि त्यांचा काळही ठरलेला आहे. जून महिना लागला की पावसाची चाहूल लागते. पावसाच्या नुसत्या आठवणीनेच उन्हाची काहिली कमी होते, म्हणूनच त्याच्या आगमनानंतर लोकांच्या आनंदाला पारावर राहात नाही. यंदा हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजाच्या एक दिवस पूर्वीच मुंबईत आणि राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या पावसाला प्रारंभ झाला. आता तो पुढील चार महिने मुक्कामी राहणार आहे. ‘अतिथी देवो भवः' या भारतीय संस्कृतीनुसार या पाहुण्याचे स्वागत केले जायला हवे. तसे ते केले गेले आणि यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडू दे, अशी कामनाही बळीराजाने केली.
 

agr_1  H x W: 0
 
 
कृषिप्रधान भारतात अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी पावसाळ्याचे महत्त्व विशेष आहे. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. राज्यात प्रथम मुंबई आणि कोकणात मान्सूनचा पाऊस पडतो आणि पुढे तो विदर्भात दाखल होतो. भारताचा विचार करता अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. उष्ण प्रदेशातील गवताळ भागात वनस्पतींची वाढ होण्याचे सर्वाधिक प्रमाण हे पावसाळ्यात असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अन्नधान्याची मुबलकता तुलनेने कमी असते. पावसाळ्यानंतर भरभरून पिके आल्यानंतर हा तुटवडा कमी होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला गायी-म्हशी गाभण राहतात तसेच वासरांना जन्म देतात. याच काळात फुलपाखरे स्थलांतर करतात. मासे, विविध प्रकारच्या बुरशी, बेडूक, आळंबीचे विविध प्रकार यांच्या वाढीचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. आता राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे.
 
 
 
 
हवामान खात्याकडून याबाबत घोषणा करण्यात आली होती. आताशी हवामान खात्याचे अंदाज खरे ठरत आहेत. याबाबतची आपली यंत्रणा सक्षम झाल्याचेच हे दर्शविते. अशी सक्षम यंत्रणा विदेशात विशेषतः इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्टे्रेलिया, जर्मनी, चीन आदी देशांमध्ये कितीतरी वर्षांआधी तयार झाली. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी संभाव्य नुकसानापासून या देशांची सुटका झाली. पण पैशांचा अभाव आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने भारताला याचा फार मोठा फटका आजवर बसत आला आहे. यंदाचे टौकते चक्रीवादळ येणार याचा इशारा मात्र हवामान खात्याने पूर्वीच दिला होता. त्यामुळे देशाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला उपाययोजना करून, या चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता आले. समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना इशारा देऊन आधीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. त्याचप्रमाणे मासेमारी करणाऱ्यांना नौका समुद्रात न टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजांनाही समुद्री लाटांपासून सावध राहण्यास सांगितले गेले होते. अग्निशमन यंत्रणा, पोलिस विभाग आणि लष्करालाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. याचा फायदा झाला आणि नुकसानीचे प्रमाण अत्यल्प राहिले. सोबतच वित्तहानी आणि प्राणहानीही कमी झाली. हवामान खात्याने त्यांच्या जागरुकतेमुळे काय होऊ शकते, हे या निमित्ताने पटवून दिले. हवामान खात्याचे अंदाज पीक, पाण्याबाबतही सातत्याने वर्तविले गेले तर येत्या काळात शेतकरी, शासन आणि बाजारपेठांनाही लाभ होऊ शकतो. पावसाबाबतचे अंदाज खरे ठरले तर मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्याच्या तारखा निश्चित करणे सुलभ होऊ शकते. पेरणी, वखरणी, कापणी आणि धान्य बाजारपेठांमध्ये पोहोचविण्याच्या वेळा निश्चित करणे सहज-सुलभ होऊ शकते. त्यामुळे लोकांचा वेळ, श्रम आणि पैशांचीही बचत होऊ शकते.
 
 
मान्सून वेळेत आल्याने शेतकऱ्यांना नियोजन करणे सुलभ होणार आहे. आजकाल पावसाळा तर येतो, पण पूर्वी विशिष्ट दिवसांमध्ये सातत्याने पडणारा पाऊस एकाच वेळी भरभर पडून जातो आणि सरासरी पूर्ण करून टाकतो. तसा एकमुस्त पाऊस शेतीसाठी मुळीच फायदेशीर नसतो. शेतीसाठी रिमझिम पाऊस लाभदायी ठरतो. अशा पावसामुळे माती पाणी धरून ठेवते, ती मृत होत नाही. तशात पिकेही तरारून येतात. आजकाल एकदा आलेला पाऊस महिनाभर दडी मारून बसतो आणि बळीराजावर त्याच्यासाठी आराधना करण्याची वेळ येते. त्यात केलेली पेरणी वाया जाते. बियाणे सुकून जातात आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची पाळी येते. अशात आर्थिक नुकसान हे ठरलेलेच असते. शेतकरी सधन असला, तर तो हे नुकसान सहन करण्याची ताकद ठेवतो. पण अल्पभूधारक शेतकरी यात नाडवला जातो. प्रसंगी कर्ज काढावे लागते, सावकाराच्या पाया पडावे लागते. अशातही पीक हाताशी आले तर ठीक, नाहीतर पुन्हा अस्मानी आणि सुल्तानीशीही सामना करावा लागतो. परिस्थितीने खंगून गेल्यास बळीराजा आत्महत्याही करतो. अशी परिस्थिती पांढरे सोने सातत्याने हातचे जाऊन विदर्भातील शेतकऱ्यांवर आली होती. ती स्थिती आता राहिली नसली तरी योग्य नियोजनाअभावी शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागल्याची उदाहरणे कमी नाहीत. त्यामुळे मान्सूनच्या पावसाचा वेध घेऊन शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करण्याची वेळ आलेली आहे.
 
 
पावसाळ्याचाच काळ रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी उपयुक्त ठरतो. पावसाच्या पाण्याची योग्य साठवणूक करण्याची गरज तज्ज्ञ वेळोवेळी व्यक्त करतात. त्यानुसार कोल्हापुरी बंधारे, शेततळी बांधून, छोटी धरणे उभारून पाणी रोखून धरता येते. रोखून धरलेल्या पाण्यामुळे जमिनीचा जलस्तर वाढून शेतीसाठी आणि पिकांसाठीही पाणी उपलब्ध होऊ शकते. थोड्या पाण्याचा पिण्यासाठीही उपयोग करता येऊ शकतो. पाणी हे जीवन आहे आणि पावसाचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे जाणून उपाययोजना करण्याची गरज आहे. मान्सूनचा पाऊस येणार अशी दवंडी पिटवूनही मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली आणि नागपुरात योग्य उपाययोजना न केल्याने व्हायचे तेच झाले. पाण्यामुळे आणि वादळामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आणि पाणी तुंबल्याने रस्त्यांना नद्यांचे, तलावांचे स्वरूप आले. मुंबईच्या तुलनेत नागपुरातील पाण्याचा जोर कमी असल्याने नुकसानही तेवढे नव्हते. पण रस्ते बंद होणे, पाणी साठणे, वाहनांमध्ये पाणी जाणे, गडरलाईनमधून पाणी बाहेर येणे, हे प्रकार यंदाही होतेच. काल रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. सायन रेल्वे स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरल्यामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचे चित्र बघायला मिळाले. राज्य सरकारने आणि महापालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाययोजना आखूनही पावसामुळे व्हायचे ते नुकसान होतेच. पावसाळा आता कुठे सुरू झाला आहे, त्याच्या मुक्कामात कमीत कमी नुकसान व्हावे आणि येणारा पाऊस साèयांसाठी सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येणारा ठरावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना!