दृष्टिहिनांना पुनर्जन्म प्राप्त करून देणारे नेत्रदान

    दिनांक :10-Jun-2021
|
- आज जागतिक दृष्टिदान दिन
नागपूर, 
नेत्रदानाचे महत्त्व अधोरखित करण्यासाठी आणि याबद्दल जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी दरवर्षी 10 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 
ngp_1  H x W: 0
 
भारतात जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टिहीन आहेत. साधारण दृष्टिदोषाने 27 दशलक्ष व्यक्ती ग्रासित आहेत. दोन्ही डोळ्यांचे अंधत्व 9 दशलक्ष लोकांना असून, 3 दशलक्ष अंध बालके आहेत. बाहुलीचा पडदा खराब असणार्‍या अंध व्यक्तींची संख्या 4.60 दशलक्ष असून, बाहुलीच्या पडदा रोपणामुळे जवळपास 3 दशलक्ष लोकांना लाभ झाला आहे. वरील आकडेवरीवरून भारतातील नेत्रविषयक प्रश्नांचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळेच दृष्टिदानाची, नेत्रदानाची किती गरज आहे, हे देखील लक्षात येईल.
 
 
 
मानवी जीवनात दृष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ अथवा ‘दृष्टी आड सृष्टी’ या म्हणी तयार झाल्या आहेत. माणूस जगातील सृष्टिसौंदर्य आपल्या नयनात साठवून ठेवतो. त्यामुळेच नेत्रांना मानवाच्या पंचेंद्रियांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. डोळ्यांचा उपयोग नयनरम्य, मनोहर सृष्टीसौंदर्य टिपण्यासाठी तर होतोच, पण या भौतिक जीवनातील ज्ञान-विज्ञान जाणून घेण्यासही होतो. नुसतीच पंचेंद्रिये कामाची नाहीत, तर ती सशक्त, सुदृढ व कार्यरत असली पाहिजेत. दैनंदिन जीवनात पदोपदी आपल्याला डोळ्यांची आवश्यकता भासते. पण, तेच कमकुवत अथवा पूर्ण दृष्टीहीन असतील तर काय होईल? त्यामुळेच दृष्टिहीन मानवाला नयनसुख मिळावे यासाठी नेत्रदान किंवा दृष्टिदान प्रत्येक व्यक्तीने केल्यास त्याचा फायदा जगातील दृष्टिहिनांना होऊ शकेल. आज उच्चशिक्षित व्यक्ती देखील मरणोत्तर नेत्रदान करण्यास कचरतात ही वस्तुस्थिती आहे. अनेकांना तशी प्रेरणाच होत नाही, तर बरेचदा विशिष्ट व्यक्तीने नेत्रदानाचा फॉर्म भरून दिल्यानंतरही त्याच्या मृत्युनंतर त्याचे नातेवाईकच भावनेपोटी व आसक्तीमुळे आपल्या प्रियजनांची ही अंतिम इच्छाही पूर्ण करीत नाहीत. मानवाच्या जीवनात मरणोत्तर केवळ नेत्रच अंधांना मदत करू शकतात. त्यामुळेच प्रत्येक माणसाने नेत्रदानाचा संकल्प केल्यास जगातील कित्येक दृष्टिहिनांना दृष्टी मिळू शकते.
 
 
अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे लोक नेत्रदान करीत नाही. पहिले म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव तसेच संस्था आणि रुग्णालयात अपूर्ण सुविधा असणे, प्रशिक्षित असलेल्या कर्मचार्‍यांमध्ये इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसणे आणि सामाजिक व धार्मिक मान्यतांमुळे भारतात नेत्रदान करणार्‍यांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळेच 135 कोटी लोकसंख्या असूनही भारतात मरणोत्तर नेत्रदान करणार्‍यांची संख्या अत्यल्प आहे. अंधत्व नष्ट करण्याचे काम आपणच करू शकतो. प्रत्येक नागरिकाने ते आपले आद्य कर्तव्य मानून नेत्रदान केले, तर जगातील अंधत्व लुप्त पावेल यात शंका नाही. श्रीलंकेसारख्या लहान देशातून स्वतःची गरज भागवून दरवर्षी सुमारे 10 हजार नेत्र निर्यात केले जातात. श्रीलंकेचे नागरिक नेत्रदान हे आपले कर्तव्य मानतात.
 
 
जसे आपण जिवंतपणी रक्तदान अथवा आपल्या जवळच्या नातलगाला मूत्रपिंड दान करतो तसेच आपण मरणोत्तर आपले नेत्र दान करू शकतो. त्यासाठी अगोदर आपली लेखी संमती एका विहित नमुन्यातील अर्जात भरून आपल्या नजिकच्या सरकारी किंवा खाजगी अधिकृत नेत्र पेढीशी संपर्क साधून सादर करावी लागते. एखाद्या व्यक्तीला असाध्य आजार असल्यास त्या व्यक्तीस नेत्रदान करता येत नाही. मात्र, निरोगी व्यक्तीस नेत्रदान करता येते. आपले पुढचे एक पाऊल एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीला नवीन दृष्टी देऊ शकते. त्याचे डोळे हे सुंदर जग पाहू शकतात. म्हणूनच प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे.