व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सुरु करण्यास मिळावी परवानगी

    दिनांक :10-Jun-2021
|
- प्रधान मुख्य वनसंरक्षकांची विनंती
नागपूर, 
मागील वर्षीपासून कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि पर्यायाने राज्याच्या वनविभागाने दिले होते. परंतु आता राज्यात कोरोनाचा आलेख उतरता असल्याने राज्यातील व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती प्रधान मुख्य वनसंरक्षक - वन्यजीव विभागाचे नितीन काकोडकर यांनी केली असून त्यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला तसे पत्र देखील त्यांनी पाठविले आहे.
 
ngp_1  H x W: 0
 
सिंहाला कोरोना झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर देशभरातील व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद करण्याचे निर्देश काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले होते. तसेच या निर्णयासंदर्भात काही सूचना असल्यास वन्यजीव रक्षकांकडून मागविल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र वनविभागाचे प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक नितीन काकोडकर यांनी प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन बंद असल्याने जिप्सीचालक, पर्यटक मार्गदर्शक आणि अतिथ्याशी संबंधीत इतर कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालेल्या उदरनिर्वाहाच्या समस्येविषयी माहिती दिली. तसेच राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पापैकी पाच प्रकल्प हे विदर्भात असून हे प्रकल्प असणारे जिल्हे स्तर एक ते तीन गटात येतात. या स्तरातील जिल्ह्यात कोरोना नियम पाळून जवळपास सर्वच सुरु करण्यात आले आहे. हेच नियम पाळून व्याघ्र पर्यटन देखील सुरु करता येईल. शिवाय ३० जूनपासून कोअर क्षेत्रातील पर्यटन पावसामुळे बंद करण्यात येणार आहे. तत्पुर्वी पर्यटनास परवानगी मिळावी अशी विनंती काकोडकर यांनी केली आहे.