गडचिरोलीत सेंद्रीय जांभळांच्या थेट विक्रीस हिरवा कंदील

    दिनांक :10-Jun-2021
|
गडचिरोली,
गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील जांभळाला नागपूर सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर मध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जांभूळ विक्रीला प्रारंभ करण्यात आला. गडचिरोलीतील कोरची सारख्या अतिदुर्गम भागात सुमारे ७६ टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात. या आदिवासी शेतकऱ्यांना जांभूळ विक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
 

jambhul _1  H x 
 
यावेळी दूाचित्र बैठकीत कृषीमंत्री दादासाहेब भुसे, संचालक व सहसंचालक कृषी विभाग, आत्मा विभाग, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व इतर मान्यवर उपस्थित होते. कोरची येथील जांभळाला उत्तम दर प्राप्त व्हावा आणि हातावर पोट असलेला आदिवासी शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सबळ आणि सक्षम बनावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे कसोशीने प्रयत्न करत होते. त्यांच्या संकल्पनेतून कोरचीतील जांभूळ विक्री नागपूर सारख्या महानगरात करण्याचा विचार पुढे आला आणि कोरोचीतील जांभळास अधिकाधिक प्रसिद्धी मिळू लागली. आतापर्यंत व्यापारी १० ते १५ रुपये किलो दराने जांभळाची खरेदी उत्पादक शेतकऱ्यांकडून करत होते. मात्र आता महिला बचत गटांच्या माध्यमातून याच जांभळाची खरेदी २५ रुपये किलो दराने केली जाणार आहे. त्यामुळे उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. या सर्वात महिला बचत गटांनी दाखवलेला पुढाकार प्रशंसनात्मक ठरला आहे.
कोरची तालुक्यातील जांभळाची विक्री सध्या चंद्रपूर, नागपूर, वडसा, ब्रम्हपुरी, छत्तीसगड राज्यातील रायपूर, राजनांदगाव, भिलाई, दुर्ग येथील व्यापारी करत होते. त्यात व्यापारी वर्गाचा पुरेपूर आर्थिक लाभ होत होता, परंतु स्वतः कष्ट करून जांभळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र ह्या जांभूळ विक्रीचा पुरेस मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे अशा उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा माननीय एकनाथ शिंदे ह्यांनी निर्धार केला व आज तो निर्धार पूर्णत्वास नेला. माननीय एकनाथ शिंदे ह्यांच्या ह्या संकल्पनेमुळे आता उत्पादक शेतकरी त्याने उत्पादित केलेल्या जांभळाची विक्री थेट बाजारात करू शकेल, ज्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी तयार होण्यास मदत होईल. जांभळाचे योग्य प्रकारे मूल्यवर्धन व्हावे ह्यासाठी जांभळाची शास्त्रीय पध्दतीने पॅकिंग करण्यात येईल. महिला बचत गटांच्या माध्यमातून थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून जांभूळ खरेदी करण्यात येणार असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ तर होईलच पण त्याचसोबत महिला बचत गटातील सदस्यांना देखील चांगले उत्पन्न मिळेल.
 
गुणकारी जांभूळ
मधुमेह, अस्थमा, ह्रदयरोग, पोटाचे आजार, कर्करोग यासारख्या विविध आजारांवर जांभूळ गुणकारी आहे. जांभळामध्ये ग्लुकोज व फुक्टोज, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडिअम, विटामीन सी, थायमीन, रायबोफलेवीन, नियासीन, विटामीन बी ६, फॉलिक अॅसिड, प्रोटिन व कॅरोटीन सारखे घटक असल्याने त्याचा बहुविध कारणांसाठी वापर केला जातो. जंगलातील जांभूळ गोळा करण्यापासून ते जांभळाचे मूल्यवर्धन करून बाजारात विकेपर्यंतच्या प्रक्रियेत समावेश असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने एकत्र येऊन मोठ्या बाजारपेठांमध्ये जांभूळ विक्री महोत्सवाचे आयोजन केल्यास ह्या व्यवसायला गती मिळेल अशा विश्वास माननीय एकनाथ शिंदे ह्यांनी व्यक्त केला.