लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम

    दिनांक :10-Jun-2021
|
- राज्यात अडीच कोटी नागरिकांनी घेतली लस
 
मुंबई, 
कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाचा भाग असलेल्या लसीकरणात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, राज्यात आतापर्यंत अडीच कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. लसीकरणात महाराष्ट्राने देशातील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. राज्यात लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून, त्यापाठोपाठ उत्तरप्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्ययमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.
 
 
laci 2_1  H x W
 
लसीकरणात महाराष्ट्र सुरुवातीपासूनच देशात आघाडीवर असून, त्यात सातत्यता कायम ठेवण्यात यश आले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात 2 कोटी 7 हजार 70 नागरिकांना लसींची पहिली मात्रा देण्यात आली आहे. दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाख 8 हजार 476 इतकी आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तरप्रदेशात 2 कोटी 15 लाख 65 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये 1 कोटी 84 लाख 76 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
9 जून रोजी राज्यात 3208 लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात आले होते. यात एकूण 2,97,760 लोकांचे लसीकरण करण्यात आले. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 9 जूनपर्यंत एकूण 2,50,15,615 लोकांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात आली आहे.