मेहुल चोक्सी बेकायदेशीर प्रवासी

    दिनांक :10-Jun-2021
|
- डॉमिनिका सरकारचा मोठा झटका
 
रोजेऊ, 
पंजाब नॅशनल बँकेचे 13,500 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा आमच्या देशातील बेकायदेशीर प्रवासी आहे, असे जाहीर करीत, डॉमिनिका सरकारने या पळपुट्या कर्जबुडव्याला मोठा झटका दिला आहे. चोक्सी हा बेकायदेशीर प्रवासी आहे, असे जाहीर करणारा आदेश डॉमिनिका सरकारने 25 मे रोजी जारी केला आहे. अँटिग्वामध्ये वास्तव्यास असलेला मेहुल चोक्सी 23 मे रोजी डॉमिनिकात पोहोचला, तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो पोलिस कोठडीत आहे. मेहुल चोक्सीने जामिनासाठी याचिका दाखल केली असली, तरी त्यावर अद्याप सुनावणी झाली नाही.
 
 
mehul_1  H x W:
 
डॉमिनिका सरकारने न्यायालयात काही दस्तावेज सादर करून, चोक्सीची याचिका फेटाळण्यात यावी आणि त्याला भारतात पाठविण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली. सरकारचा हा निर्णय चोक्सीसाठी मोठा झटका आहे. मेहुल चोक्सी त्याच्या कथित अपहरण नाट्यामुळे चर्चेत आला होता. अँटिग्वामधून डॉमिनिकाला गेलेल्या चोक्सीने आपल्याला भारतात परत नेण्यासाठी भारत सरकारने जबरदस्तीने डॉमिनिकाला नेल्याचा आरोप केला होता. मात्र, अँटिग्वा सरकार त्याला भारतात पाठविण्यासाठी तयार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने स्वतःच आपल्या अपहरण नाट्याची पृष्ठभूमी तयार केली होती, अशी धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी उघडकीस आणली होती.