नदाल-जोकोविच पुन्हा आमने-सामने

    दिनांक :10-Jun-2021
|
- पंधरा वर्षांत दोघांदरम्यान 58 वा सामना

पॅरिस, 
राफेल नदाल व नोवाक जोकोविच हे टेनिसमधील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आतापर्यंत ग्रॅण्ड स्लॅम, मास्टर्स, ऑलिम्पिक आणि डेव्हिस चषक स्पर्धेत 57 सामने एकमेकांविरुद्ध खेळले. आता शुक‘वारी रोलॅण्ड गॅरोसवर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 58 व्यांदा पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
 
 
NADAL-JOKOVICH.jpg_1 
 
हे दोन्ही प्रतिस्पर्धी 2006 मध्ये पहिल्यांचा एकमेकांविरुद्ध लढले होते. आतापर्यंतच्या त्यांच्या 57 सामन्यातील जय-पराजयामध्ये सध्या जोकोविच 29-28 ने आघाडीवर आहे. उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या नदालने अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनवर विजय नोंदविला, तर प्रथम विश्वमानांकित सर्बियाच्या 34 वर्षीय जोकोविचने इटलीच्या मॅतियो बेरेत्तिनीवर 6-3, 6-2, 6-7 (5), 7-5 असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. मी केवळ खेळण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी कोर्टवर जात आहे, असे जोकोविच या सामन्यापूर्वी म्हणाला होता. त्याने अव्वल 30 मधील तीन टेनिसपटूंला मात देऊन उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता उपांत्य सामन्यादरम्यानही आपल्यालाच प्रेक्षकांचा पाठिंबा राहील अशी आशा जोकोविचने व्यक्त केली आहे.
 
 
पॅरिसमधील अंतिम फेरीत जोकोविच आतापर्यंत नदालकडून तीन वेळा पराभूत झाला आहे, 2012, 2104 व 2020 मध्ये नदालने बाजी मारली, परंतु जोकोविच 2016 मध्ये केवळ एकदा रोलॅण्ड गॅरोसवर विजेतेपद जिंकू शकला. नदालने आतापर्यंत 13 फ्रेंच ओपनसह 20 ग्रॅण्ड स्लम विजेतेपद, तर जोकोविचने केवळ एका फ्रेंच ओपनसह 18 ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे.