नायजेरिया सरकारची ‘कू’ अ‍ॅपला अधिकृत मान्यता

    दिनांक :10-Jun-2021
|
- सुरू केला वापर, ट्विटरला शोधला पर्याय
 
नवी दिल्ली, 
‘भारताचा आवाज’ अशी ओळख असलेल्या भारतीय मायक्रोब्लॉगिंग मंच कू अ‍ॅपला नाजजेरियन सरकारने मान्यता देत आपले अधिकृत खाते देखील गुरुवारपासून सुरू केले आहे. अन्य आफ्रिकन देशांपर्यंत पोहोचण्याचा विचार कू अ‍ॅपचे निर्माते करीत आहेत.
 
 
koo 1_1  H x W:
 
अमेरिकन कंपनी ट्विटरशी वारंवार होणारे कायदेशीर वादविवाद आणि त्यांचे निर्बंध या पृष्ठभूमीवर नायजेरियाच्या सरकारने भारतीय कू अ‍ॅपला पसंती दिली आहे. नायजेरियन सरकार आणि ट्विटर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळेच गेल्या आठवड्यात नायजेरियन सरकारने त्यांच्या देशात अमेरिकन समाजमाध्यम मंच ट्विटरच्या अनिश्चितकालीन निलंबनाची घोषणा केली होती.
 
 
नायजेरिया सरकारचे अधिकृत खाते आता कू वर आहे, असे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अपरमेय राधाकृष्ण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपली प्रतिस्पर्धी कंपनी ट्विटरवर देखील ही माहिती सामायिक केली आणि नायजेरिया सरकारच्या कू इंडियावर आपले हार्दिक स्वागत. आता भारताच्याही पलीकडे पंख पसरवत आहेत, असे नमूद केले.
 
 
गेल्या आठवड्यात नायजेरियाचे अध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी फुटीरवादी चळवळीबाबत केलेले वादग‘स्त ट्विट कंपनीने काढून टाकल्यानंतर तेथील सरकारने ट्विटर अनिश्चित काळासाठी निलंबित केले होते. या घडामोडी घडल्यानंतर त्वरित आपला समाजमाध्यम मंच नायजेरियासाठी उपलब्ध आहे आणि त्या देशातील वापरकर्त्यांसाठी नवीन स्थानिक भाषा जोडण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे भारतीय कंपनी कू ने म्हटले होते. आता नायजेरियात मायक्रोब्लॉगिंग मंच कू उपलब्ध करून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कू अ‍ॅपमध्ये स्थानिक नायजेरियन भाषांचा वापर करण्याचा विचार सुरू आहे, असे मुख्य  कार्यकारी अधिकारी अपरमेय राधाकृष्ण वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.