खुर्च्या विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह!

    दिनांक :10-Jun-2021
|
- ग्रामीण भागातील शिकवणी वर्गांचे हाल बेहाल
नागपूर, 
संपूर्ण जगाला एका कोरोना नावाच्या विषाणूने थांबवले. ज्या शाळा सतत गजबजलेल्या असायच्या, त्याही मुलांअभावी ओस पडल्या. विशेष म्हणजे शिकवणी वर्ग तर सातत्याने चालूच राहायचे, तेही कोरोनाच्या दहशतीत बंद पाडण्यात आले. एक दोन महिन्यात कोरोनाचे संकट टळेल, असाच अनेकांचा होरा होता. पण सर्व काही वेगळेच घडले आणि सलग दोन वर्षे कोरोनाने वाया घातले. यासर्व धुमश्चक्रीत शिकवणी वर्ग घेणारे पूर्णत: बुडाले. जे पूर्वी लाखोत खेळायचे त्यांच्या खिसा आज रिकामा झाला आहे. या परिस्थितीचा सामना करणार्‍या शिकवणी वर्ग संचालकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चक्क खुर्च्या विकून होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
 
ngp_1  H x W: 0
 
कोरोनाची दुसरी लाट तर मानवासाठी भयानक ठरली. अनेक जण यात देवाघरी गेले. आता ती लाट ओसरल्यानंतर शासनाने स्वत:हून पुढाकार घेत हळूहळू का होईना मोकळीक दिली आहे. त्या मोकळीकमध्ये कोचिंग क्लासेसचा विचारच करण्यात आलेला नाही. शाळा बंद मग कोचिंग क्लासही सुरू कशाला करायचे, असा विचार कदाचित झाला असावा. मात्र शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना सरकारी कवच मिळालेले असते. खाजगी शिकवणी वर्ग घेणार्‍यांना कुठल्याही स्वरूपाचे संरक्षण नाही. अनुदान तर मिळण्याचा प्रश्नच नाही. अशा स्थितीत काम कराल तरच पोट भराल असाच त्यांचा नियम आहे. पण ही बाब शासनाने मोकळीक देताना विचारात घेतलेली नाही. उमरेडसह महाराष्ट्रात हजारो कोचिंग क्लासेस कार्यरत आहेत. आज त्या सर्वांची परिस्थिती कोरोनाने दयनीय केली आहे. त्यांना शासनाचा परिसस्पर्श न मिळाल्यास त्यात कार्यरत शिक्षकांना ज्ञानदान करणे सोडून इतर उद्योगाकडे वळावे लागेल. काही शिक्षकांनी तर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मोकळीक सुरू झाल्यानंतर शासनाने आमचाही विचार मानवीय भूमिकेतून करावा अन् शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशीच विनंती केली जात आहे.
आता संयम संपला तोडगा काढा
मार्च 2020 पासून आम्ही सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत आहोत. पण आता आमचा संयम संपलेला आहे. आम्हालाही पोट असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे. शिक्षकांचे पगार करायचे असतात. त्याकरिता पैसा आणायचा कुठून? पालक मुलांना पाठवायला तयार आहेत. तेव्हा शासनाने नियम ठरवून आम्हाला तत्काळ इयत्ता 10 व 12 वीचे वर्ग घेण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका उमरेडच्या परिघ कोचिंग क्लासचे संचालक विनोद पिल्लेवान यांनी मांडली.