कन्हान नदीत सांडपाणी सोडणे थांबवा

    दिनांक :10-Jun-2021
|
- जैवविविधताही आली धोक्यात
कामठी, 
पचमढी येथून पेंच नदीचा उगम झाला. तर याच मध्यप्रदेशातून कन्हान नदीचाही उगम झाला आहे. या दोन्ही नद्या नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या आहेत. परंतु वर्तमानात या दोन्ही नद्यांमध्ये नाल्यांमधील सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे या दोन्ही नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यासर्व महत्त्वपूर्ण घडामोडीचा विचार करता कन्हान नदीत सांडपाणी सोडणे थांबवा असे आवाहन भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा नेते अ‍ॅड. दादासाहेब वलथरे यांनी केले आहे.
 
kmti_1  H x W:
 
पेंच नदीवर तोतलाडोह व कामठी खैरीत धरण बांधण्यात आले आहे. याच धरणाद्वारे नागपूरसह भंडारा, खापरखेडा, कोराडीला पाणी पुरवठा केला जातो. सुमारे दोन लाख हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ याच धरणाद्वारे होत आहे. हीच पेंच नदी पुढे जाऊन कन्हान नदीला मिळते आणि तिचा प्रवाह समोरही सुरूच राहतो. काही गावापर्यंत कन्हान नदी खरोखरच व्यवस्थित आहे. मात्र कामठीतून निघणार्‍या नाल्यांतील सर्व घाण पाणी कन्हान नदीत सोडले जात आहे. नागनदीचेही पाणी याच नदीत मिसळत असल्याने भविष्यात फार मोठी समस्या उद्भवणार आहे. घाणपाणी सातत्याने मिसळत राहिल्यास कन्हान नदीतील जैवविविधताही नष्ट होणार आहे. कन्हान नदीतील मासे रुचकर आणि पौष्टीक म्हणून गणले जातात. पण सांडपाण्यामुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यासर्व गोष्टी पाहता कन्हान तसेच कामठी शहरातून कुठल्याही नालीचे, नाल्याचे पाणी कन्हान नदीत सोडू नये. सोडायचेच असेल तर त्यावर प्रथम प्रक्रिया करावी अन् नंतरच ते सोडावे याकडेही अ‍ॅड. दादासाहेब वलथरे, दिलीप मेश्राम, अ‍ॅड. ए.एन.दिघोरे, प्रा. राहुल गौर यांनी लक्ष वेधले आहे.
 
कामठीत जलशुद्धीकरण प्रकल्प लावा
कामठी शहरातील सांडपाणी कन्हान नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करायला हवी. याकरिता कामठीत जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करावा. शिवाय कन्हान नदीत नेमक्या कुठल्या गावातून सांडपाणी सोडले जाते, याचे सर्वेक्षण युद्धपातळीवर करायला हवे. त्यानंतर कृती करीत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करावेत. जेव्हा हे होईल तेव्हाच कन्हान नदीतील प्रदूषण कमी होईल.