युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे उर्वरित सामने

    दिनांक :10-Jun-2021
|
नवी दिल्ली,
आयपीएल २०२१ स्पर्धेतील उर्वरित ३१ सामने युएई मध्ये १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर पर्यंत खेळविले जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली आहे.कोरोना प्रकोप वाढल्यामुळे भारतात आयपीएल सिझन १४ चे सामने मध्येच स्थगित केले गेले होते. ४ मे पासून हे सामने थांबविले गेले होते आणि ते परत होणार की नाही याची कोणतीच खात्री दिली जात नव्हती. आयपीएलचे उरलेले सामने टी २० वर्ल्ड कप अगोदर व्हावेत यासाठी बीसीसीआय कडून प्रयत्न सुरु होते.
 
ipl _1  H x W:
 
भारतातून कोरोना अद्यापी हटलेला नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने ऑक्टोबर पूर्वी भारतात घेणे थोडे अडचणीचे ठरले होते. त्यातच टी २० वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडे आहे ते करोना मुळे अन्यत्र जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. बीसीसीआय आयपीएल प्रमाणे टी २० वर्ल्ड कप सुद्धा युएई, ओमान मध्ये आयोजित करण्याचा विचार करत असल्याचेही वृत्त आहे. आपली स्थिती स्पष्ट करण्यासाठी बीसीसीआयने आयसीसी कडे २८ जून पर्यंत मुदत मागितली आहे. ठरल्याप्रमाणे आयपीएलचे उर्वरित सामने १९ सप्टेंबर रोजी सुरु झाले तर आयपीएल आणि टी २० वर्ल्ड कप यामध्ये खुपच कमी वेळ राहील. आयसीसी जुलै मध्ये टी २० वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर करणार आहे. टी २० मध्ये १६ संघ सहभागी होणार असून त्यातील ५ टीम कसोटी न खेळणाऱ्या देशांच्या आहेत. टी २० वर्ल्ड कपची सुरवात या देशांमधील सामन्यांपासून होणार असल्याने आयपीएल आणि टी २० वर्ल्ड कप मध्ये कमी दिवसाचे अंतर राहिले तरी अडचण येणार नाही असे राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.