विद्यार्थ्यांना लागले शाळेचे वेध

    दिनांक :10-Jun-2021
|
- घरात राहून कंटाळले
- वर्गमित्र, मैत्रिणींना भेटण्याची उत्सुकता
नागपूर, 
गेल्या वर्षी कोरोनामुळे शैक्षणिक सत्र सुरू झालेच नाही. यंदाही सुरू होणार की नाही, यासंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. तरीही विद्याथ्यार्र्ंना शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. वर्गमित्र, मैत्रीण आणि शिक्षकांना भेटण्याची उत्सुकता त्यांच्यात निर्माण झाली आहे.

ngp_1  H x W: 0 
 
जून महिना सुरू होतो आणि मान्सूनचे आगमन होते, तसे शाळकरी मुलांना नवी कोरी पुस्तके वह्यांसह आणि नव्या गणवेशासह शाळेचे वेध लागतात. दरवर्षी 14 ते 26 जून या कालावधीत शाळा सुरू होतात. परंतु, कोरोनामुळे यंदा शाळा सुरू होणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय नाही. कोरोनाच्या या महामारीमुळे शहरातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा गेल्या वर्षभरात आभासी पद्धतीने घेण्यात आल्या. पहिली ते सातवी, आठवी ते दहावी व 11 वी 12 वी नंतरचे सर्व वर्ग आभासी पद्धतीने घेण्यात आले. त्यावर सराव परीक्षा सुद्धा घेण्यात आल्या. पहिली ते आठवीपर्यंत गेल्या वर्षभरात झालेल्या शैक्षणिक वर्षात सर्वांनाच उत्तीर्ण करावे असे शासनाचे आदेश आहेत. कोरोना साथीमुळे धास्तावलेल्या शिक्षण विभागाने दहावी बोर्डाच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. मागील नववी आणि दहावीच्या गुणांकानुसार उत्तीर्ण करावे असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर शासनाने बारावी बोर्डाची परीक्षाही रद्दचा निर्णय घेतला आहे.
 
 
यंदाच्या 2021-22 च्या शैक्षणिक वर्षात जून महिना सुरू झाला तरी शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी येत्या 26 जूनपासून आभासी पद्धतीने शाळा सुरू होणार अशाप्रकारची चर्चा सुरू होती. परंतु, यावर अद्याप शासनाकडून कोणताच निर्णय न आल्याचे शिक्षण विभागातून स्पष्ट केले आहे. गेले वर्षभर घरात राहून आभासी शिक्षण घेतलेली मुले आता कंटाळली आहेत. आता त्यांना आपल्या वर्गखोल्या, बेंचेस, शाळकरी मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत आपल्या शिक्षकांकडून वर्गात शिक्षण घेण्याची तीव्र उत्कंठा आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते आणि शाळेची पहिली घंटा कधी वाजते, याकडे शाळकरी मुले आणि पालकांचे तसेच शिक्षकांचेही लक्ष लागून राहिले आहे.