कोरोनाबाधित सासर्‍याला पाठीवर घेऊन सुनेची दोन किमी पायपीट

    दिनांक :10-Jun-2021
|
नवी दिल्ली, 
कोरोना सकारात्मक असलेल्या महिलेला तिच्या कोरोनाबाधित सासर्‍याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना आसाममधील नगाव येथे घडली.
 
 
Niharika-Das.jpg_1 &
 
निहारिका दास असे या महिलेचे नाव असून, आपल्या सासर्‍याला पाठीवर घेऊन रुग्णालयात जातानाचे तिचे छायाचित्र समाजमाध्यमांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रसारित होत आहे. विशेष म्हणजे, निहारिका आपल्या सासर्‍याला पाठीवर घेऊन जात असतानाचे छायाचित्र अनेकांनी काढले. काहींनी त्याची चित्रफीतही बनविली आणि समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केली. काहींनी छायाचित्र सामायिक करताना ‘आदर्श सून आहे’ अशी ओळही टाकली. पण, या छायाचित्र काढणार्‍यांपैकी आणि चित्रफीत बनविणार्‍यांपैकी एकहीजण तिच्या मदतीला धावले नाही, हे विदारक वास्तव पुढे आले आहे.
 
 
महिलेच्या सासर्‍याला कोरोनाचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करायचे होते. पण, तिला कुणीही मदत करत नव्हते. शेवटी या महिलेने तिच्या सासर्‍याला पाठीवर घेतले आणि तब्बल दोन किलोमीटरची पायपीट केली व सासर्‍यासोबत ती स्वत:ही रुग्णालयात भरती झाली. मात्र, निहारिकाने एवढी प्रचंड धावपळ केल्यानंतरही ती सासर्‍याचा जीव वाचवू शकली नाही. रुग्णालयात दाखल करतेवेळी तिचे सासरे जवळपास बेशुद्ध झाले होते. रुग्णालय प्रशासनाला त्यांचे प्राण वाचवण्यास अपयश आले.