नोव्हेंबरपासून 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण

    दिनांक :10-Jun-2021
|
- ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार लसींची चाचणी
 
नवी दिल्ली, 
18 वर्षांवरील सर्वांनाच मोफत लस देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच जाहीर केला. आता 18 वर्षांखालील मुलांचेही लसीकरण करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर चाचणी केली जाणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकने लहान मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीची प्रकि‘या सुरू केली आहे. या संस्थेच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, ही चाचणी पूर्ण व्हायला चार ते साडेचार महिने लागतील. चाचणीचा परिणाम ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत येण्याची अपेक्षा आहे.
 
 
las 2_1  H x W:
 
चाचणीचे परिणाम आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून लहान मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. यात काही कारणामुळे उशीर झाला, तर जानेवारी 2022 पासून लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल. लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरू होण्याआधी एम्सने धक्कादायक खुलासा केला आहे. 50 टक्के लहान मुले संक‘मित असल्याचे एम्सच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. एम्समध्ये ज्या लहान मुलांवर चाचणी घेण्यात आली, त्यापैकी बहुतेक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती स्कि‘निंगमधून समोर आली आहे.
 
 
एम्सच्या वतीने 10 शहरांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. यातील अहवालानुसार, देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. बरीच मुले अशी होती, ज्यांना कोरोना झाला, पण त्यांना त्याबद्दल माहितीच नव्हती. या मुलांच्या पालकांनाही याविषयीची कल्पना नव्हती. या मुलांमध्ये मोठ्या लोकांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुस आणि घशात संसर्ग यासारखी कोरोनाची गंभीर लक्षणे नव्हती. केवळ सर्दी, खोकला आणि ताप आला होता.
 
लहान मुलांसाठी 3 कोरोना लसी
लहान मुलांसाठी तीन कोरोना लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी भारतातच तयार करण्यात आलेली भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे. या लसीच्या वैद्यकीय चाचणीला काही दिवसांपूर्वीच परवानगी मिळाली आहे. याच महिन्यात ही चाचणी सुरू होणार आहे. ऑक्टोबरपर्यंत ही चाचणी पूर्ण होणार असल्याचे कंपनीने सांगितले. लहान मुलांना विदेशी लस देण्याची तयारी देखील सरकारने सुरू केली आहे. अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फायझर ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे, जिची लस मुलांनाही दिली जात आहे. आता ही लस भारतातील मुलांना दिली जाणार असल्याचे दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.