जेएनयूमध्ये ग्रंथालयात विद्यार्थ्यांची तोडफोड

    दिनांक :10-Jun-2021
|
- सुरक्षा रक्षकांनाही मारहाण, गुन्हा दाखल
 
नवी दिल्ली, 
देशविरोधी घोषणा आणि हिंसाचार यासारख्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहणार्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सुमारे 35 ते 40 विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घालत ग्रंथालयात तोडफोड केली. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या सुरक्षा रक्षकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी आज गुरुवारी दिली.
 
 
library at JNU_1 &nb
 
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने या विद्यापीठातील ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास काही विद्यार्थी तिथे आले आणि सुरक्षा रक्षकांना ग्रंथालय उघडण्यास सांगितले. मात्र, आम्हाला तशी परवानगी नसल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आणि ग्रंथालयाचे दार काठ्या मारून तोडण्याचा प्रयत्न केला.
 
 
या ग्रंथालयाला तीन मोठे दार आहेत. ते तोडण्यात अपयश आल्यानंतर विद्यार्थ्यांनी लहान गेटला असलेल्या काचा फोडल्या आणि आत प्रवेश करून प्रचंड नासधूस केली. ग्रंथालयातील कपाटांना लागलेल्या काचाही फोडल्या. त्यांच्या मागोमाग सुरक्षा रक्षकही आत आले. तिथेही विद्यार्थ्यांनी त्यांना मारहाण केली. मात्र, सुरक्षा रक्षकांनी नंतर बळाचा वापर करून सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
 
 
पोलिस आल्यानंतरही विद्यार्थ्यांचा हिंसाचार सुरूच होता. वारंवार इशारा दिल्यानंतरही विद्यार्थी ऐकत नसल्याचे पाहून अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणली. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.