दक्षिण पथावरचा प्रवासी... शेषाद्रीजी!

    दिनांक :10-Jun-2021
|
ऊन-सावली
- गिरीश प्रभुणे  
थोडा उशीरच झाला. तशी काही कारणं नसावीत, पण वेळ यावी लागते हेच खरं! तसा त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य, शांत. पारंपरिक वेशभूषा, दोन भुवयांच्या मधोमध खास कर्नाटकी विशिष्ट लाल रंगाचं कुंकू, गंध. संथ लयीत चालणं, तसंच बोलणं, एक सांस्कृतिक वैभव त्यांच्यासमवेत ते घेऊन आले! संघाचं असं पहिलं संकलन, गुरुजींच्या विचारांचं, ‘बंच ऑफ थॉट्स' यांनी संपादित केलेलं होतं. कानडीतले मान्यवर साहित्यिक, चतुरस्र लेखक, संघाचे मर्म समजलेले सर्व आयाम कर्नाटकात फुलत गेलेले. त्यांच्या पाठोपाठ संघ प्रचारकांची एक अनोखी टोळी अखिल भारतीय पातळीवर कार्यरत झाली. सूर्यनारायण राव, उपेंद्र शेणॉय, सीताराम शास्त्री, कृष्णप्पा, दत्ताजी होसबळे, मंगेशजी भेंडे, हरिभाऊ वझे ही काही नावं. संघात पद्य गीत म्हणण्याची एक आगळी परंपरा आहे. सर्व भाषांतून अशा गीतांचा भांडार आहे. राष्ट्रभक्तीपर असंख्य प्रेरणादायी गीतं अज्ञात कवींनी लिहिलेली. अशा हिंदी गीतांची एक सुश्राव्य ध्वनिफीत प्रथम निघाली. कानडी गायक-गायिकांच्या मधुर आवाजात एका वेगळ्या ढंगात गायलेली गीतं खूप गाजली. केवळ एका जिल्ह्याचं एक लाख गणवेशधारी स्वयंसेवकांचं एक शिबिर मंगलोरला झालं. दंतकथेत शोभावेत असे अनेक कार्यक्रम! कर्नाटकातील संघ काम म्हणजे संघ शाखेतून तयार झालेले स्वयंसेवक काय काय करू शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे.
 
unsawli_1  H x
 
 
शेषाद्रीजींच्या काळात अशी कामं देशभरात सुरू झाली. अण्णा हजारेंच्या राळेगणला शेषाद्री यांच्या उपस्थितीत सहा दिवसांचा एक अखिल भारतीय वर्ग झाला. ग्रामविकासाचे अनंत पैलू यामध्ये आले. तसाच एक वर्ग शिक्षण क्षेत्रावर बंगळुरूला झाला. भारतीय शिक्षण, वेद, विज्ञान, पारंपरिक कलाकौशल्य, कारागिरी याचा ऊहापोह या वर्गात झाला. कर्नाटकात या प्रकारचे अनेक प्रयोग आधीपासूनच सुरू झाले होते. स्वतंत्र मुलींचं असं गुरुकुल, संस्कृत माध्यमाचं, यशस्वीपणे सुरू होतं. यामध्ये समाजातील सर्व स्तरांतील मुलींना प्रवेश होता. मुत्तुर हे संस्कृत ग्राम. या गावातील सर्व व्यवहार संस्कृतमधूनही होतात. अगदी दलित, कोळी वस्तीमध्ये न शिकलेले आई-वडीलसुद्धा संस्कृतमधून संभाषण करताना मी पाहिले. पाणलोट विकासाचं एक विलोभनीय असं काम भारतीय परंपरेला धरून, ग्रामीण विकासाचा एक आराखडा प्रत्यक्ष उतरलेला मी पाहिला. माझं भाग्य की, मला ही सर्व कामे अगदी जवळून पाहता आली. तिथं राहता आलं आणि प्रत्येक ठिकाणी शेषाद्रीजींचा गुरुतुल्य सहवास मला लाभला. 
 
 
एकदा प्रांत प्रचारक मुकुंदराव पणशीकर मला म्हणाले, ‘‘वर्तक यांचा तुला फोन येईल... शेषाद्रीजी तुझ्याशी काही बोलू इच्छितात. ते सध्या मुंबईत आहेत तू त्यांना भेट'' त्यामुळे मी त्यांना भेटायला मुंबईत गेलो आणि मग दिवस ठरला. पारधी समाजातील महिलांचा हा प्रकल्प आहे. ही जागा त्यांच्या नावाने खरेदी केली. प्रामुख्याने महिलांवर अत्याचार होण्यामागची कारणं- नवरा सोडून देणं, नवऱ्याने त्यांना सोडून देणं किंवा त्यांची विटंबना करून त्यांना हाकलून देणं, एवढं सगळं झालं तरी दुसरं लग्न करणं. असं असूनही अत्यंत हीन पद्धतीने वागणूक दिली जायची. यामुळे हे प्रथम वसन करताना घरातली पत्नी, बहीण, मुलगी, आई या सगळ्यांच्या वाट्याला सन्मानाचे जगणे यायला हवं आणि हे यायचं असेल तर त्या सर्वांना एकाच वेळेला त्यांच्या माथ्यावर असणारे कलंक धुवून टाकून त्यांना सन्मानाने समाजात वावरायला मिळायला हवे, त्यातला मुख्य भाग तिला प्रथम नवरा, मुलं, कुटुंब यांच्यासाठी आपल्याला जगायचं; यामध्ये आपला सन्मान आहे. आपल्याला स्त्री म्हणून बाजारातलं मूल्य, जसे एखाद्या वस्तूला असते, तसं आपल्याला आपल्या समाजात विकलं जातं, हे तिला समजायला हवं, या आणि अशा बाबी या प्रकल्पाच्या उभारणीअंतर्गत येत होत्या. शेषाद्रीजींनी हे सगळे ऐकून आश्चर्य व्यक्त केले. त्यातील स्त्रियांची ही स्थिती ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मला एक महिन्यानंतरची तारीख दिली. प्रथमच अशी कुणी मोठी व्यक्ती पारध्यांच्या पालावर येणार होती.
 
 
तो काळ सारंच अद्भुत वाटावा असा होता. एका माळरानावर ती पाच-पन्नास पारधी कुटुंबांची पालं, त्यांची भांडणे, मारामाऱ्या , जातपंचायती या सगळ्यातून मार्ग काढत त्यांनी स्थिर व्हावं, उत्तम कौटुंबिक जीवन जगावं यासाठी तो प्रयत्न होता आणि त्याचा भाग म्हणून या सर्व स्त्रियांना पारंपरिक जाचातून मुक्त करून, त्यांचं पाप कुणीतरी डोक्यावर घेणे गरजेचे होतं. एक पर्याय ओघात मी ते स्वीकारलं होतं. त्याचा दंड समाजाला मी द्यायचा होता, तो शेषाद्री यांच्या हस्ते दिला. समाजातील शिवाशिंदे यांनी गदगदलेल्या स्वरात या दंडाचा स्वीकार केला. उघड्या बोडक्या माळावर, वरती आभाळ त्याचेच छत आणि अज्ञात संचितांनी करकचून बांधलेला पारधी समाज. हा एका वेगळ्या वातावरणात मुक्त श्वास घेऊ लागला. या कार्यक्रमानंतर सोलापुरात शेषाद्रीजींचा एक जाहीर कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमातून अनेक गोष्टी साध्य होणार होत्या. पारधी समाज त्याच्याविषयीचे समज-गैरसमज, संघाविषयीचे समज-गैरसमज, स्वयंसेवकांच्या मनात या एकूणच कामाविषयी साशंकता होती. हे काम संघाच्या प्रचलित पद्धतीच्या बाहेरचं होतं. अन्याय, अत्याचार, महिलांवरील अत्याचार, पोलिसांचं वागणं त्याविरोधात सतत अर्ज-विनंत्या, आंदोलने करावी लागत. संघाची कार्यपद्धती कोणताही कार्यक्रम, कोणतीही योजना करायचा असल्यास त्यासाठी बैठक व्हायला हवी. तपशीलवार योजना ठरवायला हवी. कार्यकत्र्यांच्या जबाबदाऱ्या  ठरायला हव्यात. असं सगळं होऊन मगच एखादा कार्यक्रम होत असे. त्यासाठी सर्वांची मानसिक तयारी करून घ्यावी लागते. इथे तर रोज नवीन समस्येचं आभाळ कोसळे. अशात कुठली बैठक? कुठल्या चर्चा? कुठल्या परवानग्या होत नसत. त्यामुळे ज्यांना संघ कार्यपद्धतीतूनच काम करण्याची सवय होती, त्यांना हे असं काम रुचत नसे. त्यामुळे संघ कार्यकत्र्यांचा एक समरसून काम करणारा घटक, जो सतत या कामाच्या मागे उभा असे आणि दुसरा सतत या कामातल्या अडचणी आणि संघाची आचारसंहिता कशी पायदळी तुडवली जाते. कशा अचानक व्यवस्था कराव्या लागतात. अत्यंत दोन टोकांची मानसिकता या कामाच्या प्रारंभी होती. त्यामुळे शेषाद्रीजींचं येणं, यासाठी जाहीर कार्यक्रम घेणे, हे तसं परंपरेला धरून नव्हतं. एक नवी सामाजिक समरसतेचे लहर या कार्यक्रमातून निर्माण झाली. एक वेगळ्या प्रकारचं मानसिक, सामाजिक ताणतणावातून जाणारं काम शेषाद्रीजींच्या प्रवासामुळे सुलभ झाले. खरं तर हा केवळ संघाच्या कार्यपद्धतीतला बदल नव्हता; हा एक सामाजिक क्रांतीचा प्रयोग होता. तो काळ महाराष्ट्रातील अनेक सामाजिक गुंत्यांचा काळ होता. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालेलं होतं.
 
 
नामांतराच्या लढ्यांमधील सामाजिक तणावाचं वातावरण निवळण्यास संघाच्या स्वयंसेवकांनी खूप प्रयत्न केले. त्यातली महत्त्वाची एक बैठक शेषाद्री यांच्या उपस्थितीत जालना येथे झाली. महाराष्ट्रातील, विशेषता मराठवाड्यातील सर्व कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक, भाजपा, विद्यार्थी परिषद अशा अनेक संघप्रणीत संस्थांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत शेषाद्रीजींनी नामांतर का, कशासाठी, त्यातील सामाजिक परिवर्तनाची, सामाजिक ऐक्याची, महाराष्ट्रातील, देशभरातील आणि हिंदू समाजातील ऐक्यासाठी नामांतराची आवश्यकता कशी आहे, हे समजावून सांगितले. सरकार्यवाह हे पद संघामध्ये निर्णयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे शेषाद्रीजींच्या प्रवासाचा, बोलण्याचा नामांतराच्याच नव्हे, तर एकूणच सामाजिक वातावरण बदलण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने केलेले प्रयत्न आणि संघासारख्या व्यापक पायावर उभ्या असलेल्या संघटनेने केलेले प्रयत्न यात निश्चितच फरक आहे.