योगी आदित्यनाथ आणिउत्तरप्रदेशची निवडणूक

    दिनांक :10-Jun-2021
|
दिल्ली वार्तापत्र
श्यामकांत जहागीरदार 
मराठा आरक्षणासह राज्यातील काही प्रश्न घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाणही होते. मात्र, राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी आणि वाहिन्यांनी मोदी आणि ठाकरे यांची ‘वन टु वन' बैठक झाली, अशा बातम्या चालवत याचा बादरायण संबंध महाराष्ट्रातील कथित सत्तांतराशी जोडण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी देशाच्या पंतप्रधानांची भेट घेण्यात गैर ते काय, असा टोलाही लगावला. हे सांगण्याचे कारण म्हणजे माध्यमांचा असाच अनुभव उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही नुकताच आला. भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी राजधानी लखनौला जाऊन योगी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री तसेच आमदार आणि खासदारांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. भाजपात असा प्रकार नियमित होत असतो. याच दरम्यान भाजपाचे उत्तरप्रदेशचे प्रभारी राधामोहनसिंह यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली. याचे निमित्त करीत माध्यमांनी उत्तरप्रदेशात नेतृत्वबदल होणार, अशा बातम्या चालवल्या.
 

yogi_1  H x W:  
 
मुळात उत्तरप्रदेशात नेतृत्वबदल करण्याचा विषय माध्यमं सोडली तर भाजपा नेतृत्वाच्या मनातही नव्हता. उत्तराखंडमध्ये नेतृत्वबदल झाला म्हणून उत्तरप्रदेशातही नेतृत्वबदल होणार, असे तारे माध्यमांनी तोडले. दोन-तीन दिवसांच्या माध्यमांतील या विचारमंथनातून शेवटी उत्तरप्रदेशात नेतृत्वबदल होणार नाही; सहा-आठ महिन्यांनी होणारी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातच लढली जाईल, हे स्पष्ट झाले. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योग्यवेळी घेतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे आधी वेगवेगळ्या गृहितकांच्या आधारावर बातम्या चालवणारी माध्यमं तोंडावर आपटली. कोणत्याही राज्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा योगी आदित्यनाथ यांचा उपयोग करीत असते; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या खालोखाल योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभा देशभर होत असतात. योगी आदित्यनाथ यांचे भाजपातील हे महत्त्व माध्यमांना दिसले नाही, की दिसूनही त्यांनी दुर्लक्ष केले, ते समजत नाही.
 
 
उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, याचा अर्थ ते भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहतील, हे स्पष्ट आहे. २०१७ मध्ये उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि चेहऱ्यावर भाजपाने ही निवडणूक लढवली होती. भाजपाच्या या व्यूहरचनेला त्यावेळी जबरदस्त यशही मिळाले होते, ३०० पेक्षा जास्त जागा भाजपाने राज्यात जिंकल्या होत्या.
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले नव्हते. आसाममध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नसतानाही भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपाला भरघोस यश न मिळण्याची जी काही कारणं आहेत, त्यातील एक कारण भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता, हे आहे. भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नसल्यामुळे कारण नसताना पश्चिम बंगालमध्ये मुकाबला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झाला. खरं म्हणजे राज्यात ममता बॅनर्जी विरुद्ध बाबुल सुप्रियो, दिलीप घोष, शुभेंंदू अधिकारी, मुकुल रॉय असा सामना व्हायला हवा होता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जी चूक झाली, त्याची पुनरावृत्ती भाजपा उत्तरप्रदेशात करणार नाही, असे मानले जात होते.
 
 
केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तरप्रदेशातून जात असतो. कारण, उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्यच नाही, तर सर्वाधिक म्हणजे ८० खासदार लोकसभेत पाठवणारे राज्यही आहे. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर दोनच वर्षांनी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावताना भाजपा आपल्या हातून यावेळी कोणतीही चूक अनावधानाने पण होणार नाही, याची काळजी घेणार आहे. नव्हे, तशी काळजी घेणे त्याला क्रमप्राप्त आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. काँग्रेसनेही निवडणूक रिंगणातून अप्रत्यक्ष माघार घेतली होती. त्याचा फटका भाजपाला बसला; मात्र पश्चिम बंगालमध्ये जे झाले, त्याची पुनरावृत्ती उत्तरप्रदेशात होऊ शकणार नाही. कारण दोन राज्यांतील राजकीय परिस्थितीत खूप फरक आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपासमोर मुख्यमंत्रिपदावर १० वर्षांपासून असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचे मोठे आव्हान होते. उत्तरप्रदेशात भाजपासमोर असे कोणतेही आव्हान नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा उत्तरप्रदेशात भाजपा पाच वर्षांपासून सत्तेवर आहे आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उत्तरप्रदेशातील भाजपाविरोधी एकाही पक्षाच्या नेत्याचा टिकाव लागू शकत नाही.
 
 
उत्तरप्रदेशात भाजपाविरोधी आघाडी प्रत्यक्षात येण्याची शक्यताही अतिशय कमी आहे. कारण, अशा भाजपाविरोधी आघाडीचे अनेक प्रयोग उत्तरप्रदेशातील जनतेने आधीच हाणून पाडले आहेत. उत्तरप्रदेशच्या राजकारणाचा विचार केला तर राज्यात भाजपाशिवाय समाजवादी पक्ष (सपा), बहुजन समाज पक्ष (बसपा) आणि काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष आहेत. सपाचे मुलायमसिंह  यादव हे उत्तरप्रदेशातील मोठे नेते होते. आता मात्र त्यांनी जवळपास राजकारण संन्यास घेतला असून पक्षाची सर्व सूत्रे मुलगा अखिलेश यादवकडे सोपविली आहेत. बसपाचे नेतृत्व मायावती यांच्याकडे आहे. पण राज्याच्या राजकारणात मायावती यांचा प्रभावही आधीसारखा उरलेला नाही. काँग्रेसजवळ तर राज्यात प्रदेश पातळीवर नाव घेता येण्यासारखा एकही नेता नाही. प्रियांका वढेरा उत्तरप्रदेशात गलितगात्र झालेल्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करीत आहे, पण त्यांच्या प्रयत्नाला आतापर्यंत यश आलेले नाही.
 
 
२०१४ मध्ये उत्तरप्रदेशात काँग्रेसला लोकसभेच्या दोन जागा जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर काँग्रेसच्या जागा अध्र्याने कमी झाल्या, म्हणजे काँग्रेसला एकच जागा जिंकता आली. अमेठी मतदारसंघात भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. सोनिया गांधी या आता उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या एकमात्र खासदार आहेत. उत्तरप्रदेशात राजकीय आघाडीवर जेवढे प्रयोग झाले, तेवढे देशात कधी झाले नसतील. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात सपा आणि काँग्रेस यांची आघाडी झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर सर्वात धक्कादायक सपा आणि बसपा अशीही आघाडी झाली होती. मतदारांनी सपा आणि बसपा आघाडीला जोराचा धक्का दिला, हा भाग वेगळा. भाजपा आणि बसपाही उत्तरप्रदेशच्या राजकारणात काही काळासाठी जवळ आले होते. उत्तरप्रदेशच्या राजकारणात आता बसपा आणि काँग्रेस यांचीच आघाडी होणे बाकी आहे.
 
 
आजच्या स्थितीत भाजपा काही छोट्या पक्षांशी युती करण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी सपा आणि बसपा यांच्यापैकी कोणाशीही युती करण्याची भाजपाला गरज नाही. भाजपाच्या विरोधात सपा, बसपा आणि काँग्रेस एकत्र येण्याची वा यातील कोणतेही दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यताही दूरदूरपर्र्यंत दिसत नाही. राज्यात भाजपाच्या विरोधात सपा-बसपा, सपा-काँग्रेस वा बसपा-काँग्रेस अशी कोणतीही आघाडी होईल, असे आज तरी वाटत नाही. त्यामुळे राज्यात भाजपाविरोधी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधी मतांचे विभाजन झाले नाही, जे भाजपासाठी अडचणीचे ठरले. उत्तरप्रदेशात भाजपाविरोधी मतं सपा, बसपा, काँग्रेस आणि काही मुस्लिम पक्षांमध्ये विभागली जाणार आहेत; ज्याचा फायदा भाजपाला मिळणार आहे, यात कोणतीही शंका नाही. मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची जवळपास सव्वाचार वर्षांची कारकीर्द अतिशय चांगली आहे. अयोध्येत वेगाने सुरू असलेले राममंदिराचे बांधकाम ही यावेळी भाजपाची आणखी एक जमेची बाजू ठरणार आहे.
९८८१७१७८१७