यश = धन, सन्मान, समाधान? की आणखी काही?

    दिनांक :06-Jun-2021
|
कशासाठी? यशासाठी! 
- डॉ. नितीन विघ्ने
काय हवं आपल्याला आयुष्यात? यश? म्हणजे नेमकं काय हवं? बर्‍याच लोकांना यश म्हणजेMoney, Respect व Satisfaction म्हणजेच धन, सन्मान, समाधान प्राप्त करणे. पण खरं तर यश म्हणजे नेमकं काय? ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर व गरजांवर अवलंबून आहे. आपल्या गरजा व विचारधारेप्रमाणे आपण आपले ध्येय ठरवत असतो. जर आपण आपले ध्येय प्राप्त केले तर आपण यशस्वी झालो, असे आपण म्हणतो.
 
 
goals-1.jpg_1  
 
काळमर्यादेनुसार ध्येयाचे चार प्रकार पडतात.
Types of Goal
1. जीवनाचे ध्येय (Life Time Goal),, 2. दीर्घ मुदतीचे ध्येय (Long Term Goal), 3. अल्प मुदतीचे ध्येय (Short Term Goal), 4. कार्यरत किंवा लगेच कार्यान्वित करण्याचे ध्येय(Operational Goal).
समाजसेवक अण्णा हजारे त्यांच्या भारतीय सेनेतील वाहनचालकाच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांची यशाची व्याख्या कुटुंबासोबत बसून सुखाने आयुष्य घालवायची नव्हती. त्यांच्या राळेगणसिद्धी गावाचा विकास, समाजसेवेद्वारे देशाची सेवा ही त्यांची यशाची कल्पना होती. मग त्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या धनाचा व वेळेचा वापर आपल्या गावासाठी करून गावाला आदर्श गाव म्हणून विकसित केले.
 
 
 
जडाव पायेंग 16 व्या वर्षी वनमजूर म्हणून काम करीत होता. आसाममधील नदीकाठच्या वाळवंटात पुरानंतर उष्णतेने मेलेल्या शेकडो सापांना त्याने पाहिले. इतर मजूर पाच वर्षांचा करार संपल्यावर निघून गेलेत. पण, पुन्हा असेच साप व इतर प्राणी मरतील हे लक्षात घेऊन हा एकटाच तिथे थांबला. निव्वळ भूतदयेने त्याने ठरवले... या वाळवंटाचे जंगल बनवायचे! कुटुंबाची कशीबशी गुजराण करणार्‍या जडाव पायेंग या साध्या अशिक्षित गरीब मजुराची यशाची कल्पना वन्यप्राणी व वनस्पतींना सुरक्षित घर म्हणजेच जंगल तयार करून देण्याची होती. 1979 ते 2008 या 29 वर्षात कुणाकडूनही काही अपेक्षा न ठेवता व मदत न घेता एकट्याने आधी 20 बांबूंची झाडे सापांसाठी व हळूहळू लाखो झाडे लावून जंगलच तयार केले. त्या भागात कुणी जातच नव्हते. वस्तीत नासधूस करणारे हत्ती कुठून आलेत म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक जेव्हा त्या भागात आलेत तेव्हा जंगल पाहून थक्क झाले. तेव्हा त्यांना कळले फक्त एकट्या माणसाने काय चमत्कार केलाय! मग पायेंगला अनेक पुरस्कार मिळाले. 2015 मध्ये भारताचा पद्मश्री पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला. आज त्याला पूर्ण जगात भारताचा फॉरेस्ट मॅन म्हणून ओळखतात. अजूनही तो थांबलेला नाही. जेथे जेथे असे वाळवंटाचे पट्टे आहेत तेथे जंगल तयार करायचे, हेच त्याचे आजही ध्येय आहे. त्याच्या मनात त्याने कधीच धन, सन्मान वगैरेची अपेक्षा केली नाही. मात्र, समाधान खूप मिळविले; स्वतःसाठी आणि पशु, पक्षी, वेगवेगळी जनावरं सगळ्यांसाठीच!
 
 
मोलकरीण म्हणून काम करणारी, एक मुलाची माता असलेली सुहासिनी मिस्त्री वयाच्या 24 व्या वर्षी विधवा झाली. तिच्या खेड्यात एकही डॉक्टर नव्हता म्हणून आजारपणात तिच्या नवर्‍याचा जीव गेला. महिन्याला जेमतेम 100 रुपये कमावणार्‍या सुहासिनीचे ध्येय होते... गावात दवाखाना उघडणे व मुलाला डॉक्टर बनवणे! डॉक्टर नसल्यामुळे पुन्हा कोणाचा जीव जाऊ नये ही त्या मागची भावना होती. काम अशक्यच वाटत होते. पण दिवसभर मेहनत करूनसुद्धा रात्री आपल्या ध्येयाच्या वेडापायी ती तळमळत असे. सततच्या अडचणी, अवहेलना व थट्टेला न जुमानता तिने प्रचंड इच्छाशक्ती व अथक प्रयत्नाने यश मिळविले. थोडे थोडे पैसे जमवून आधी तीन एकर जागा घेतली व त्यात दहा बाय दहाच्या खोलीत दवाखाना उघडला. आज ती नि:शुल्क सेवा देणार्‍या तीन मजली मोठ्या ह्युमॅनिटी हॉस्पिटलची मालकीण आहे व मुलगा डॉक्टर आहे. तिलासुद्धा अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
11 सप्टेंबर 1893 साली शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी सर्वधर्म परिषदेत भारताच्या हिंदू धर्मावर अद्वितीय व्याख्यान दिले. त्यानंतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे हिंदुधर्म व अष्टांगयोग प्रसाराचे उत्तम कार्य केले. पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी, निःस्वार्थ जीवन आणि हिंदू धर्माच्या प्रसाराचे ध्येय बाळगून सतत कार्यरत राहण्याच्या व्यक्तिमत्त्वाचा इतका जबरदस्त परिणाम पूर्ण जगावर झाला, की त्यामुळे अनेकांचे जीवनच बदलून गेले. त्यांचे ध्येय उच्च कोटीचे होते. त्यामुळे त्यांचे जीवनसुद्धा अतिशय सन्माननीय व अभूतपूर्व असे होते. या उलट समाजविघातक मनोवृत्ती असलेल्या बिन लादेनचे ध्येय नीच प्रकारचे असल्यामुळे त्याचे फळही त्याला तसेच मिळाले. हिंस्र श्वापदाला घेरून शिकार करावी तसेच लादेनला मारले. स्वामीजींचे उच्च कोटीचे ध्येय व लादेनचे नीच ध्येय या दोन टोकाच्या ध्येय प्रकारात प्रचंड फरक होता. योगायोगाने वर्ष जरी वेगळे असले, तरी तारीख 11 सप्टेंबर हीच आणि देश अमेरिका हाच होता.
या सगळ्या उदाहरणांवरून काय शिकायचे आपण?
 
1. आपलं ध्येयं फक्त आपल्या स्वार्थापुरतं मर्यादित नसावं तर समाजाच्या किंवा वनस्पती आणि इतर प्राणिमात्रांच्या भल्याचासुद्धा त्यात विचार केलेला असावा.
2. जशी असेल आपल्या ध्येयाची गुणवत्ता तशीच असेल आपल्या जीवनाची गुणवत्ता! सोबतच्या चित्रातून ध्येयाच्या गुणवत्तेचा फरक स्पष्ट होतो.
 
ध्येयपूर्ती व यशप्राप्तीमध्ये सवयीची भूमिका :
1. जसा विचार आपण करतो तशीच कृती आपल्या हातून घडत असते.
2. कृतीतून परिणाम जन्म घेतो. त्यावरच आपलं समाधान अवलंबून असतं.
3. एकदा समाधान किंवा आनंद मिळाला की, आपण तीच कृती पुन:पुन्हा करतो.
4. अशा प्रकारे आपल्याला सवय लागते.
5. जर आपला उद्देश किंवा ध्येय चांगलं असेल तर सवयीमध्ये आपल्या आवडीची व दुर्दम्य इच्छाशक्तीची भर पडते. याप्रकारे नंतर एक सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह आवर्तन म्हणजेच सायकल तयार होते.
6. याचा आपल्यावर चांगला परिणाम होतो व आपलं सकारात्मक व्यक्तिमत्त्व आकारास यायला लागतं.
7. या पद्धतीने एक सकारात्मक कार्यप्रणाली म्हणजे सिस्टिम तयार होऊन त्याद्वारे आपल्याला यश मिळू लागतं. याचा थोडक्यात अर्थ हाच की, सकारात्मक विचार व कृतीच्या सवयीच आपल्याला यश देतात. तेव्हा आपल्या विचारांकडे व आपल्या सवयींकडे बारीक लक्ष ठेवून आवश्यक ते बदल कसे करीत राहिले पाहिजेत. त्याचा तक्ता खाली दिला आहे. ध्येयपूर्तीसाठी कशा प्रकारची व कोणती मेहनत घ्यायला हवी, याचे परीक्षण करणे आवश्यक असते. त्यात काय काय तपासायचे; त्याचा तक्ता खाली दिला आहे. त्यात 1. प्रयत्नांचे प्रमाण म्हणजे संख्या, 2. प्रयत्नांची गुणवत्ता, 3. विविधता, 4. प्रकार, 5. चिकाटी व मेहनत, 6. पुनरावलोकन, 7. त्यानंतर प्रयत्नांत केलेले बदल या बाबींचा अंतर्भाव आहे. त्यानुसार परिणामांची म्हणजे रिझल्टचीसुद्धा पुढील बाबतीत चिकित्सा करणे आवश्यक आहे. 1. संख्या, 2. गुणवत्ता, 3. विविधता, 4. प्रकार व 5. सुधारणांची संभावना.
 

nitin-vighne02.jpg 1_1&nb 
 
‘कशासाठी? यशासाठी!’ या लेखमालेत आपण आतापर्यंत सॉफ्ट स्किल्स व त्यांचे तीन प्रकार यशप्राप्तीसाठी कसे महत्त्वाचे आहेत हे पहिले. नंतर परिवर्तनातून व्यक्तिमत्त्व विकास, स्वयंपरीक्षणाच्या पद्धती; त्याचे महत्त्व, करिअरच्या निवडीसाठी आवश्यक स्वयंपरीक्षणाच्या पद्धती व महत्त्वाचे मुद्दे समजून घेतलेत. त्यानंतर ध्येय-निर्धारण स्मार्ट गोल-सेटिंग व आज ध्येयाचे प्रकार व आवश्यक गोष्टी आपण लक्षात घेतल्यात. या सगळ्या प्रक्रियेत अनेक पालकांना व विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की, जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीने ध्येय निर्धारण व संबंधित व्यक्तिमत्त्व विकासासाठी कोणत्या वयात सुरुवात करावी? आमच्या संशोधनातून जन्माच्या पाच महिने आधीपासून तर वयाच्या अठरा वर्षापर्यंत अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा जिनियस बनण्यासाठी पंधरा स्तरीय कार्य प्रणाली तयार केली आहे. त्यात होणार्‍या बाळाच्या पालकांनी बाळाचा जन्म होण्याच्या पाच महिने आधीपासून तर बाळाच्या वयाच्या पाच वर्षापर्यंत काही विशिष्ट कार्यप्रणाली प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. जशी आपली उंची आपल्या वयाच्या 18 वर्षापर्यंतच वाढते; अगदी त्याचप्रमाणे बाळाच्या मेंदूची स्थापत्य-व्यवस्था (architecture) किंवा मेंदूचा विशिष्ट विकास वयाच्या पाच वर्षापर्यंतच होत असतो. तेव्हा मेंदू विकासाशी संबंधित कुठला आजार पाच वर्षाच्या आत कळला तर आवश्यक चांगला बदल घडवून आणायची संधी असते. एकदा का पाच वर्ष वयाची मर्यादा ओलांडली की मग काहीच उपाय नसतो. तसेच अनेक दोष किंवा काही लर्निंग डिसॉर्डर्स अगदी वयाच्या दोन वर्षापासूनच दिसू लागतात, पण पालकांना त्या लक्षणांची ओळखच नसल्यामुळे त्या बाळाची काहीच चिकित्सा होत नाही. कारण ताप आला किंवा रडू लागला तरच त्याला डॉक्टरकडे नेतात. पण जर तो खेळातच मग्न असेल तर थोडा वेगळा खेळतो, असे पालकांना वाटते व ते दुर्लक्ष करतात.
 

nitin-vighne03.jpg_1  
 
त्याचप्रमाणे हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे की, ऑलिंपिकसारख्या जागतिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक्सच्या काही प्रकारात गोल्ड मेडल मिळविणार्‍या मुलामुलींचे वय फक्त बारा किंवा तेरा वर्षाचे असते. त्यांचे प्रशिक्षण वयाच्या तिसर्‍या किंवा चौथ्या वर्षीच सुरू होते. तेव्हा मुलाचे वय कोणतेही असले, तरी त्या वयानुसार मानसिक व शारीरिक विकास होतो आहे किंवा नाही, हे तपासून पाहायलाच हवे. मागच्या 30 मे च्या लेखात अगदी शेवटी दिलेला तक्ता पुन्हा पाहावा. वाचकांच्या मनातील शंका ते फोन करून लेखकाला विचारू शकतात.
 
(लेखक सायकॉलॉजिस्ट, करीअर कौन्सेलर व सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आहेत)
 - 9822462968