ममता सरकार अल्पजीवी ठरणार

    दिनांक :06-Jun-2021
|
- मिलिन्द माधव ठेंगडी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी या राजकीय थयथयाट माजविणार्‍या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या 5 मे रोजी त्यांनी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आपल्या निरंकुश सरकारची पायाभरणी केली, त्याला काल, शनिवारी 1 महिना पूर्ण झाला. भरपूर बहुमत घेऊन सत्तेवर आलेल्या या सरकारची ही नवी सुरुवात लक्षणीय ठरायला हवी होती, मात्र अपेक्षेप्रमाणे शपथ घेतल्या-दिवसापासूनच ममतांची मुलूखमैदान तोफ गरजू लागली. त्यांचे केंद्र सरकार सोबतचे मतभेद सध्या गाजत आहेत. त्यामुळे या सरकारचे किंवा पश्चिम बंगालचे कसे होणार, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचा मेदिनीय ज्योतिष्यातून घेतलेला हा वेध...
ममता बॅनर्जी यांनी 5 मे 2021 रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी कोलकाता येथे शपथ घेतली. (त्यावेळची कुंडली सोबत दिली आहे.)
 
 
mamata_1  H x W
 
शपथविधीची कुंडली कर्क लग्नाची आहे. त्याचा स्वामी चंद्र कुंडलीच्या अष्टम या प्रथम दर्जाच्या वाईट स्थानात आहे. ज्योतिषशास्त्रात याला मृत्युस्थान म्हणतात. तेथे चंद्रासोबत सहाव्या या आणखी एका वाईट स्थानाचा स्वामी गुरु बसला आहे. सहावे स्थान हे शत्रुस्थान आहे. गुरु आणि चंद्र यांची अंशात्मक युती अष्टमात आहे. एरवी गुरु-चंद्र हा प्रथम दर्जाचा उत्तम योग होतो. मात्र वाईट स्थानामधून तो झालेला असल्याने त्याचे शुभत्व कलंकित झाले आहे. लग्नेश-षष्ठेश अष्टमात हा योग अल्पजीवी बनवितो.
 
 
या कुंडलीतील दुसरा वाईट योग म्हणजे, कुंडलीचा मारकेश व अष्टमेश असलेला स्वराशी मकरेचा शनि कुंडलीच्या लग्नस्थानावर पूर्ण द़ृष्टीने पहात आहे. या शनिची भाग्य व सुखस्थानावर देखील पूर्ण वाईट दृष्टी आहे. याशिवाय, दशम या सरकारच्या स्थानातील मेषेचा स्वामी मंगळ कुंडलीच्या व्यय या आणखी एका वाईट स्थानात गेला आहे. तर त्याचा राशीस्वामी बुध स्वस्थानाच्या व्ययात राहूने ग्रासला आहे. खरे तर हे अकरावे स्थान लाभाचे मानले जाते, मात्र ते या कुंडलीला बाधकस्थान असून त्याचा स्वामी शुक्र तेथेच व्ययेशाच्या युतीत व राहूने ग्रस्त आहे.
 
 
या कुंडलीतील एकमेव जमेची बाजू म्हणजे सरकारचा कारक मानला जाणारा रवि हा दशम या सरकारच्याच स्थानात मेष राशीत उच्चीचा आहे. कुटुंब स्थानाचा स्वामी असलेला रवि स्थानबली आहे. येथे कुटुंब म्हणून ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षाचा विचार करता येईल. रविच्या या बलवत्तेमुळे त्यांचा पक्ष बहुमत घेत सरकार बनवू शकला. मात्र त्यालाही गालबोट लागले आहे. तेथे हर्षल ग्रहाने रविशी युती केली आहे. ती सरकारबाबत अनिश्चितता निर्माण करते. शपथविधीची कुंडली नवमांशात आणखी बिघडली आहे. येथे सरकारचा कारक रवि स्वतःच्या नीच म्हणजेच सर्वात कमजोर अशा तुला नवमांशात प्रथम स्थानी आहे. या कुंडलीचा लग्नेश चंद्र हा नवमांशात तृतीय स्थानी केतूने युक्त असून त्याच्यावर शनि, राहू व नेपच्यूनची दृष्टी आहे. या कुंडलीत मंगळ प्रबळ मारकेश असून तो चतुर्थात उच्चीचा व स्थानबली असला तरी तो अष्टमेश शुक्रासोबत आहे. त्या दोघांची सरकारच्या स्थानावर दृष्टी येत आहे.
 
 
मेदिनीय ज्योतिष्यात प्लूटोची देखील महत्त्वपूर्ण भूमिका मानली जाते. हा विकृती, वैगुण्य, विक्षिप्तपणा, घातपात असल्या वाईटांचा कारक मानला जातो. शपथविधी कुंडलीत प्लूटो शनिसोबत असून लग्नाला पाहत आहे तर नवमांश कुंडलीत तो मंगळ-शुक्राच्या सोबतीने सरकारच्या स्थानावर दृष्टी टाकत आहे. प्लूटो दोन्ही कुंडल्यांतील वैगुण्याला हातभारच लावत आहे.
 
 
अशा कां आहेत ममता बॅनर्जी?
पश्चिम बंगाल सरकारचा विचार करतानाच त्याच्या म्होरक्याच्या, म्हणजेच ममता बॅनर्जींच्या कुंडलीचाही आढावा घेणे आवश्यक आहे. (त्यांची उपलब्ध जन्मकुंडली सोबत दिली आहे.)
ममता बॅनर्जींच्या जन्मकुंडलीत चंद्र, गुरु व शनि हे तीन महत्त्वाचे ग्रह उच्च राशीत आहेत. याशिवाय मेष लग्नाच्या केवळ 2 अंश 54 कलांवर असलेली ही कुंडली अनेक वर्गात वर्गोत्तम येत असल्याने फारच बलवान ठरली आहे. भरीस या मेषेचा स्वामी मंगळ लाभस्थानात आहे. ममतांची रास वृषभ आहे. तेथे असलेला चंद्र स्वतःच्या उच्च राशीत आहे. या कुंडलीत गुरु भाग्येश आहे. तो चतुर्थातील कर्क राशीत उच्च झाला आहे. तर शनि हा दशम व लाभ स्थानाचा स्वामी सप्तमात तुला या राशीत उच्च होत जन्म लग्नाला पाहात आहे. या शनिची भाग्य व सुखस्थानावरही दृष्टी येत आहे.
 
 
ममतांच्या कुंडलीत षष्ठ स्थानाचा स्वामी बुध हा भाग्य स्थानात असून त्याच्यावर उच्च शनिची दृष्टी आहे. हा योग काहीसा वानरराज बालीसारखा आहे. शत्रूची अर्धी शक्ती ममतांना मिळते. त्यामुळे विरोधात कोणीही असो, ममतांचे पारडे जडच राहिले आहे. त्यांनी डाव्यांची सत्ता मोडून काढली आणि स्वतःचे अधिराज्य बंगालमध्ये स्थापन केले... आणि इतके जबरदस्त की डाव्यांचे नामोनिशाणही यावेळी पहायला मिळाले नाही. भाजपला बंगालमध्ये यावेळी स्वतःचे बळ वाढवण्यात यश आले असले तरी झुंज प्रखर द्यावी लागली आहे, हे मानावेच लागेल.
 
 
नेमके बिघडले कुठे?
ममता बॅनर्जींच्या नवमांश कुंडलीत लग्न व भाग्येश गुरु वर्गोत्तम म्हणजेच शुभ व उच्च पद योग देणारे आहेत. शनिने त्यांना प्रचंड चिकाटी दिली आहे. वर्गोत्तम लग्नाने त्यांना जबरदस्त हिंमत दिली आहे. असे असूनही ममतांच्या या गुणांना गालबोट लावणारे योग याच कुंडलीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुंडलीतील पंचम या शुभस्थानाचा स्वामी रवि हा तुला या नीच नवमांशात गेलेला असल्याने कलुषित झाला आहे, तर प्लूटो हा वैगुण्य व विक्षिप्तपणा देणारा ग्रह जन्मकुंडलीत पंचम या शुभ स्थानात तर नवमांश कुंडलीत लग्न बिंदूवरच आहे. शिवाय गुरु व राहूचा नवमांशात झालेला योग वाईटच ठरतो आहे. ममता बॅनर्जींच्या कुंडलीत असे प्रबळ योग असूनही त्या स्वतः या निवडणुकीत कां हरल्या व त्यांचे हे सरकार बहुमतात असूनही अल्पायुषी ठरण्याचे संकेत कां मिळतात, असा प्रश्न निर्माण होतो. त्यादृष्टीने पाहता-
 
 
ममता बॅनर्जींना 2007 पासून शनिची महादशा सुरू आहे. शनि जन्मकुंडलीत सप्तम स्थानात उच्च आहे. या शनिने त्यांना बंगालमध्ये मजबूतपणे पाय रोवण्याची संधी दिली. मात्र त्यांना सध्या या शनिच्या महादशेतील राहूची अंतर्गत दशा 31 मार्च 2021 पासून सुरू झाली. राहू जन्म कुंडलीत भाग्य स्थानात आहे. ही अंतर्दशा 2024 पर्यंत असून सध्या राहूचीच विदशा 3 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. हा राहूचा काळ त्यांना अतिशय वाईट जाणार आहे.
 
 
साधक-बाधक मुहूर्त
ममता बॅनर्जी यांनी शपथविधीसाठी 5 मे 2021 ही तारीख निवडली. ही त्यांची जन्मतारीख आहे. या दिवशी त्यांच्या कुंडलीतील पंचम या शुभ स्थानाचा स्वामी रवि गोचरीने मेष राशीत उच्चीचा होत जन्मलग्नी येत होता. तो सरकार स्थापनेस योग्यच होता. दुसरे म्हणजे मुहूर्तासाठी आवश्यक असलेले चंद्रबळही ममतांच्या कुंडलीत त्या दिवशी होते. चंद्र लाभस्थानात भाग्येश गुरुसोबत बलवान योग करीत आहे. शिवाय दशमेश शनि दशमात, लग्नेश मंगळ पराक्रमात वगैरेही ग्रहस्थिती शपथ घेण्यास उपयुक्त होती.
ममता बॅनर्जी यांचा जन्म दिवस व शपथविधीचा दिवस एकच म्हणजे बुधवार होता. बुधवारी रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु हे नक्षत्र उत्पात कारक आणि वृषभ व मिथुन या उत्पात राशी ठरतात. म्हणजेच या नक्षत्र व राशींमध्ये असणारे ग्रह अतिशय वाईट फल देणारे व प्रसंगी घात करणारे असतात. ममतांचा जन्म दिवस व शपथविधीचा दिवस एकच असल्याने या नक्षत्र व राशीमधील ग्रह त्यांना व सरकारला सारखेच घातक ठरतील हे उघड आहे. तसा विचार करता ममतांच्या कुंडलीत आर्द्रा नक्षत्रातील केतू, पुनर्वसुतील गुरु, वृषभ राशीचा चंद्र व मिथुनेचा केतू घातक ठरतात. शपथविधी कुंडलीतील राहू हा रोहिणी या प्रथम दर्जाच्या उत्पात नक्षत्रात असून त्या दिवशीचा चंद्र राहूच्याच शततारका नक्षत्रात आहे. याशिवाय शपथविधी कुंडलीतील मंगळ आर्द्रा या राहूच्याच नक्षत्रात, तर बुध, शुक्र व राहू हे वृषभ या उत्पात राशीत आहेत. फसवी परिस्थिती तयार करून तोंडघशी पाडणे हे राहूचे वैशिष्ट्य आहे... आणि ते सारे यावेळी राहूने जमवून आणले आहे.
 
 
सरकारचा घातक काळ
ममता बॅनर्जी यांना सुरू असलेली अंतर्दशा राहूची आहे. शपथविधीचे दिवस-नक्षत्र शततारका म्हणजे राहूचेच होते. ताजिक पद्धतीनुसार विचार करता सरकारला राहूची महादशा सुरू होऊन ती 54 दिवसांची असणार आहे. त्यानंतर गुरुची 48 दिवसांची दशा राहील. गुरु शपथविधी कुंडलीचा बाधकेश असून तो अष्टमात उत्पात नक्षत्रातील राहूने ग्रस्त आहे. त्यानंतरच्या 57 दिवसांच्या शनिच्या दशेचा विचार केला तर शनि शपथविधी कुंडलीत मारकेश व अष्टमेश असल्याने तो प्रबळ मारकेश ठरतो. गुरु व शनि हे दोन ग्रह ममतांच्या जन्म कुंडलीत उच्च व बलवान असले तरी या दशाकाळात गोचरीने ते उत्पात नक्षत्रांमधून जात असल्याने त्यांना सध्याचा काळ वाईट ठरत आहे. त्यांना या निवडणुकीत पहावा लागलेला स्वतःचा पराभव हे त्याचे दृश्य रूप आहे. त्यामुळे येणार्‍या काळात कोणता ग्रह घात करेल, तेच आता पहायचे.
 
 
काय काय घडू शकते...
या दोन्ही कुंडलींमधील योगांचे संभाव्य परिणाम पाहण्यासाठी आपल्याला गुलिक आणि मांदी या दोन गणितसिद्ध बिंदूंची मदत होऊ शकते. हे दोन्ही अतिशय वाईट फल देणारे उपग्रह मानले जातात. ममता बॅनर्जी यांच्या जन्मकुंडलीत गुलिक आणि मांदी व्यय स्थानातील मीन राशीत आहेत, तर सरकारच्या शपथविधी कुंडलीत ते प्रथम स्थानात आहेत. त्यातही गुलिक हा तर लग्न बिंदूवरच आहे. त्यामुळे-
 
1) ममता बॅनर्जींचे सरकार अल्पजीवी ठरते. लग्नबिंदूवरील गुलिकमुळे तर कुठल्याही परिस्थितीत ते कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असे ठाम म्हणता येईल. 2) हेच गुलिक-मांदी राज्यात अराजक माजवण्याचेही संकेत देतात. 3) सरकारचे स्वतःचेच काही निर्णय विरोधात जातील व त्यामुळे सत्तेला मुकावे लागेल. 4) सरकारमधीलच काही लोक विश्वासघात करू शकतात. 5) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. 6) ममतांच्या कुंडलीत व्ययातील गुलिक-मांदी बंधन योग घडवितात. त्यांचा प्रभाव संपुष्टात येऊ शकतो. 7) याच उपग्रहांमुळे राज्याच्या विभाजनाचेही संकेत मिळतात. 8) कुंडलीत दक्षिण दिशेस ग्रहांचे आधिक्य असल्याने ते बंगालचे उत्तर-दक्षिण असे भाग पाडू शकतात. 9) विभाजित प्रदेश केंद्रीय राजवटीखाली आणले जाऊ शकतात. 10) मंगळाच्या प्रभावामुळे राज्यात लष्करी कारवाई होऊ शकते.
 
ज्याच्या जोरावर हे सरकार स्थापन झाले तो रवि सध्या उत्पात नक्षत्रांपैकी रोहिणीत आहे. तो 8 जूनला मृग नक्षत्रात जाईल, त्यानंतर 21 जूनला तो आर्द्रा या राहूच्या नक्षत्रात जाईल... आणि राहू तर 54 दिवस हातात धरून टपूनच बसला आहे. तो संधी शोधतोय.थोडक्यात, ममता सरकारला विघातक कुयोग सुरू झाले आहेत. त्यांचे दृश्य परिणाम कधीही समोर येऊ शकतात.
-मिलिन्द माधव ठेंगडी, नागपूर
लेखक ज्योतिष प्रवाह या प्रथम वैदर्भीय ज्योतिष-मासिकाचे संपादक आहेत.
- 8600105746