विषाणू, विभाजनकारी-विध्वंसक राजकारण आणि तिसरी लाट

    दिनांक :06-Jun-2021
|
- हितेश शंकर
भारताने कोरोनाच्या दोन लाटांचा सामना केला आहे आणि आता तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू आहे. या दरम्यान दोन प्रकारे तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भारत संपूर्ण सकारात्मकतेसह लसीकरणाची तयारी करीत आहे. लसीकरणाबाबत आम्ही जगात विक्रम प्रस्थापित करीत आहोत. लसींसाठी कच्चा माल प्राप्त करण्यासाठी अमेरिकेशी चर्चा सुरू आहे. आम्ही पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केला हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. दुसरी लाट थरकाप उडविणारी होती. परंतु, संभाव्य तिसर्‍या लाटेपूर्वीची आमची तयारी, सुसज्जपणा हेच दर्शवित आहे की, आम्ही डगमगलेलो नाही; आम्हाला झटका बसला आहे. मात्र, विजयाचा संकल्प, दृढनिर्धार अद्यापही कायम आहे.
 
 
indian-politics_1 &n
 
तर, दुसरीकडे देशात नकारात्मकतेचे राजकारण करणारे काही कंपू संभाव्य तिसर्‍या लाटेचा आधार घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्योगाला लागले आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकून उतरलेले हे योद्धे असे आहेत, की ज्यांच्याजवळ कुठलाही तर्क नाही; तथ्य-वस्तुस्थिती माहीत नाही, लोककल्याणाची भावनाही नाही. भारतीय लोकशाहीच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात नाराज-संतप्त विरोधकांच्या एकतेच्या घटकांना समजून घेणे आवश्यक आहे आणि या अशा भयंकर आपत्तीच्या काळातही ‘तिसर्‍या लाटेचे’ स्वागत करण्यास कोण उतावीळ आहे, हे देखील समजून घेणे आवश्यक आहे.
 
 
नाराज विरोधी पक्ष आणि अराजकतेची ‘इकोसिस्टम’
चीनसारख्या एकपक्षीय राजवटीत आणि व्यक्तिकेंद्रित यंत्रणेत सर्व गोष्टी दडपल्या जाऊ शकतात. मात्र, भारत म्हणजे चीन नाही. अमेरिकेसारख्या द्विपक्षीय भांडवलशाही देशाप्रमाणे व्यक्तीऐवजी ताळेबंदावर नजर ठेवून मनमानी फायदा कमविण्याचा कार्यक्रम सुरू राहिला असता. मात्र, भारत म्हणजे अमेरिकादेखील नाही. भारतातील लोककल्याणाची संकल्पनादेखील पाश्चिमात्त्य कल्याणकारी संकल्पनेहून वेगळी आहे. समाजाला दुर्बळ करून सर्वकाही सरकारवर सोपविणे आणि मग प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे हात पसरणे हे या राष्ट्राच्या संस्कारांत नाही. येथे लोक सरकारच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करतात आणि शासन यंत्रणाही लोकांच्या मनाचा ठाव घेणारी असते. या दृष्टीने पाहिल्यास भारतीय लोकशाही जगातील सर्वात जुनी अद्वितीय व्यवस्था आहे.
 
 
सरकार खूप शक्तिशाली आहे आणि त्यामुळेच ते मनमानी करते, असा युक्तिवाद भारतातील काही लोक करतात. मात्र, आज विरोधी पक्षांची जी वाईट स्थिती झाली आहे, जी दुर्दशा झाली आहे याचे मुख्य कारण म्हणजे खराब धोरणे आणि भ्रष्टाचार आहे. ही गोष्ट मात्र त्यांनी लक्षात घेतलेली नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष सक्षम, प्रबळ असला पाहिजे. परंतु, विरोधी पक्ष सुस्थितीत नसेल तर याचे खापर कुठल्या पक्षावर अथवा सरकारवर फोडता येणार नाही. विरोधकांची धोरणे आणि अंत:स्थ हेतू किती लोकाभिमुख, प्रामाणिक आहे, यावरच विरोधी पक्षांचे अस्तित्व व यशापयश अवलंबून असते. हा एक घटक झाला आणि दुसरा घटक म्हणजे मोदी सरकारवर नाराज, संतप्त विरोधकांची एकता! विरोधकांच्या या संतप्त, चिडखोर मानसिकतेमुळे एक पारिस्थितिक तंत्र अथवा ‘इकोसिस्टीम’ तयार होते. मात्र, हे संधिसाधू विरोधकांकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. विरोधी पक्ष जनतेशी कोणता खेळ करीत आहेत; त्यांची कशी दिशाभूल करीत आहेत, याकडे ते सोयीस्कर दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आज या सर्वांची दुर्दशा झाली आहे.
 
 
संकटाला आमंत्रण देण्याची तयारी!
दिल्लीत प्राणवायू पुरवठा गैरव्यवस्थापनाचा ‘सर्वश्रेष्ठ नमुना’ दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दाखविला आहे. आपण अराजकतावादी आहोत हे त्यांनी यापूर्वीच सार्वजनिक रीत्या जाहीर केले आहे, ही गोष्ट विसरू नका. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सर्वात जास्त अराजकता देशाची राजधानी दिल्लीत पाहायला मिळाली, याविषयी आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. लोक रस्त्यावर मृत्युमुखी पडले, ठेल्यांवरून मृतदेह वाहून न्यावे लागले. प्राणवायूच्या संदर्भात न्यायालयात ही बाब उघडकीस आली, की दिल्ली सरकारने काही मोजक्याच, पसंतीच्या रुग्णालयांना प्राणवायू पुरवठा केला आणि अन्य रुग्णालयांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. या सगळ्या पाठीमागे दुसरे कुणी नव्हे तर खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्रीच होते. या गोष्टीचा खुलासाही न्यायालयात झाला.
 
 
एकीकडे देश विविध समस्यांशी झुंज देत आहे तर दुसरीकडे दिल्ली सरकार पुन्हा संकटाला निमंत्रण देण्याची तयारी करीत आहे. दिल्लीत 18 वर्षांपेक्षा अधिक म्हणजे युवकांसाठीचा कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राज्य सरकारने बंद केला आहे.
कोरोना काळात दिल्लीचे संकट पंजाबचे, उत्तर प्रदेशचे अथवा संपूर्ण देशाचे संकट बनावे यासाठी प्रयत्नरत असलेल्या घटकांना दिल्ली सरकार पाठिंबा देत आहे. भारत बायोटेकद्वारे निर्मित स्वदेशी लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक विदेशी लसींची वकिलीच नव्हे, तर विदेशी कंपनीशी थेट संपर्क साधण्याच्या स्तरावर उतरले आहेत. आपल्या औषधामुळे, लसीमुळे काही दुर्घटना घडल्यास नुकसानभरपाई देण्याची यांची इच्छा नाही. त्यामुळेच ते विदेशी कंपन्यांशी करार करण्यास उतावीळ झाले आहेत.
 
 
संकटाच्या या कालखंडात ‘आंदोलनजीवीं’ची एक रांग सीमा अडविणे, वाहतूक रोखणे व अन्य उपद्रव करण्याच्या तयारीत गुंतली आहे तर दुसरी रांग मुलांसाठी लसीची चाचणी करण्याच्या मार्गात अडथळे आणत आहे. एवढेच नव्हे, तर संकटकाळात देशाच्या अडचणीत, त्रासात अधिकच भर टाकणारा खेळ देशाने 26 जानेवारीलासुद्धा पाहिला होता. एक टूलकिट तेव्हादेखील समोर आली होती. 26 मे रोजी दुसर्‍यांदा अशीच टूलकीट पुन्हा नव्याने दाखल करण्याची तयारी होती. स्वत:ला विरोधी पक्ष म्हणविणारेच उपद्रवकारी व विध्वंसक तत्त्वांना उराशी कवटाळत आहेत, हे सारा देश पाहात आहे. मात्र, या संपूर्ण कारस्थानामागे नेमके कोण आहे हे उघडकीस येणे हीच या संकटकाळातील सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि त्यामुळेच आता महामारीच्या विषाणूशीदेखील लढायचे आणि विध्वंसक-विभाजनकारी राजकारणाशीदेखील, हाच संकल्प समाजाने घेतला आहे.
(लेखक पाञ्चजन्यचे संपादक आहेत.)