पूर्वज, ओळख आणि 75 वर्षांची गुटी!

    दिनांक :18-Jul-2021
|
- हितेश शंकर
गाझियाबाद येथील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी केलेल्या उद्बोधनावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे आपण अलीकडेच पाहिले आहे. या उद्बोधनात त्यांनी काय म्हटले, ते आपण पाहू-
- हिंदू-मुस्लिम ऐक्य हा शब्दच भ्रामक आहे. हे दोन्ही वेगळे नाहीच; तर मग ऐक्याची गोष्ट कशी काय होईल? दोन्ही धर्म जुळलेलेच असल्याने आणखी काय जोडायचे आणि आपण जुळलेलो नाहीत असे हे मानतात, त्यावेळी दोन्ही धर्म संकटात येतात. हीच गोष्ट झालेली आहे. तुमच्या पूजेची पद्धत वेगळी असल्याने तुम्ही वेगळे आहात, अशी पद्धत आपल्या देशात नाही. आपण एकच आहोत आणि आपली मातृभूमी आपल्या ऐक्याचा आधार आहे.
 
 
mohanji-bhagwat--------ne
 
- आपण समान पूर्वजांचे वंशज आहोत, हे विज्ञानानेदेखील सिद्ध केले आहे. 40 हजार वर्षांपासून आपल्या भारतीयांचा डीएनए सारखाच आहे.
- येथे एकही मुसलमान राहणार नाही, असे हिंदूंनी म्हटले, तर ते हिंदू राहणार नाहीत. हे आम्ही रा. स्व. संघात प्रथमच सांगितलेले नाही, ही विचारधारा डॉक्टर हेडगेवार यांच्या काळापासूनची आहे. कारण, हिंदुस्तान एक राष्ट्र आहे, इथे आपण सर्व एकच आहोत. इतिहास असेल, पण सर्वांचे पूर्वज समान आहेत.
- लोकांचे धर्मांतरण करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी त्यांना चर्चेत गुंतवून ठेवणे, हा देखील चर्चेचा एक अर्थ निघतो.
- कट्टरवादी येत गेले आणि चक्र उलटे फिरवत गेले. असेच खिलाफत आंदोलनावेळी झाले होते. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली. आम्ही वेगळे आहोत, तुम्ही वेगळे आहात, हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजकीय पातळीवर आपल्याला सांगितले जाते.
- आपण लोकशाहीवादी आहोत. हिंदू किंवा मुस्लिम वर्चस्वाबाबत कुणीही बोलू शकत नाही. भारताच्या वर्चस्वाबाबत सर्वांनी बोलायला पाहिजे.
 - आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो; याचा अर्थ टिळा लावणारा, पूजा करणारा, असा होत नाही. जो भारताला आपली मातृभूमी समजतो, जे आपल्या पूर्वजांचे वारसदार आहेत, संस्कृतीचे वारसदार आहेत, ते हिंदू आहेत.
 
 
हिंदू-मुस्लिमांच्या वास्तविक ऐक्यावर आणि विशेषतः सरसंघचालकांच्या उद्बोधनाचे अर्धवट विश्लेषण करणार्‍या बौद्धिक प्रपंचकांनी, ते या कामात किती पारंगत आहेत, हे दर्शवण्याचा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही. परंतु, एखादा समाज ग्लानीत असेल, तर अशा प्रकारच्या घटना त्याला बौद्धिक पातळीवर हादरवून जागे करतात. जेव्हा ऐक्याची चर्चा होते, त्यावेळी गप्पा खूप होतात. मात्र ऐक्याचे वास्तविक प्रयत्न केले जात नाही, हे आपण दशकांपासून पाहत आलो आहोत.
 
 
भारताचे अंतर्भूत ऐक्य रेखांकित करण्याचा प्रयत्न होताच, विभाजक रेखांचे राजकारण करणार्‍या लोकांची फडफड सुरू होते. अशा परिस्थितीत माध्यमांतील काही ‘एलिट क्लब’ राजकीय मालकांना माल-मसाला उपलब्ध करून देण्याचे काम करतात. अशाच वर्गाने सरसंघचालकांच्या उद्बोधनावर वादग्रस्त कोनातून बातम्या प्रसारित केल्या. ज्यांनी सरसंघचालकांचे भाषण ऐकले, त्यांना यात काहीच आपत्तीजनक वाटले नाही. जर तुम्ही डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या काल्पनिक जगात नसाल आणि 1947 साली भारत नावाचा एक देश निर्माण करण्यात आला, हे मानत नसाल, तर तुम्ही तुमची मुळं ओळखता. हा देश केवळ जमिनीचा एक तुकडा नसून, सनातन संस्कृती आहे, जी शतकांपासून येथे विकसित झाली आहे, असे आपल्या मुळांसोबत जुळलेले भारतीय मानतात.
 
 
आपले पूर्वज एकच होते, ही बाब अरब जगतात मुस्लिम म्हणवल्या जाणार्‍या भारतीय मुसलमानांनादेखील माहीत आहे. भारतीय मुस्लिमांचे अरब जातीसोबत काही देणे-घेणे नाही, हे भारतीय मुसलमानांना हिंदू म्हणणार्‍या अरबांना माहीत आहे. आपला भूतकाळ एक होता आणि भविष्यही एकच आहे, हे आम्हा भारतीयांसाठी हिंदू-मुस्लिमपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. आपला भूतकाळ एक होता आणि भविष्यही एकच आहे. हीच महत्त्वपूर्ण बाब आहे. ‘आपले भविष्य ऐक्याचे होऊ शकते’, ही भारतीय समाजाची गुंजणारी हाक फोडा आणि झोडा या राजकारणाच्या पुरस्कर्त्यांना घाबरवून सोडते. त्यामुळेच अशा वेळी ते खळबळ निर्माण करतात.
 
 
काही कथित इतिहासकारांनी राजकीय इच्छाशक्तीमुळे आपला इतिहास विकृत केला, हे वास्तव आहे. इंग्रजांनी पेरलेले आणि नेहरूवादाने पोसलेल्या वरवरच्या ऐक्याच्या गुलाबी गोष्टी ते करतात. परंतु, शिक्षणापासून ते व्यवस्थेपर्यंत समाजात फुटीरतेच्या भेगा अधिक रुंद करतात. ही बोचरी पण वास्तविक बाब आहे. उदाहरणासाठी-
उच्चवर्ग-मागासवर्गातील अंतर कमी करण्याच्या प्रयत्नांऐवजी आर्य-द्रविड संघर्ष, भारतीयांच्या वेगळ्या अस्मितेची काल्पनिक पट्टी आम्हाला इंग्रज आणि त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियावाल्या समर्थकांनीच पढवली आहे! हे सत्यच सांगण्यात आले! आर्य बाहेरून आल्याचे भारतीयांना सातत्याने शिकवण्यात आले. लक्ष द्या, जगातील कोणताही इतर देश आमच्या येथून आर्य भारतात गेले, हे शिकवत नाही. हे उलट नाही का! न हलता कोणती वस्तू एका जागेवरून दुसर्‍या जागेवर पोहोचते? ज्यावेळी असे आणि अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, त्यावेळी तथाकथित इतिहासकार, नेहरूवादाचे ढोल पिटणारे त्यात डोके घालतात. पण, विभाजनाच्या रेषेवर वाढणारे राजकारण अपयशी ठरते.
 
 
मध्य आशियातून आलेल्या आर्यांनी सिंधू संस्कृती नष्ट करून भारत जिंकला, असा सिद्धांत पाश्चिमात्त्य विचारवंतांनी वसाहतींच्या काळात तयार केला. हिसारच्या जवळ सिंधू खोर्‍यातील संस्कृतीचे एक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखीगढी येथे इसवीसन पूर्व 2500 मधील आढळलेल्या सांगाड्याची डीएनए चाचणी केल्यामुळे हे सिद्ध झाले की, आर्य मूळचे भारतातील होते आणि वैदिक संस्कृतीची रचना दक्षिण आशियामधील स्थानिक रहिवाशांनीच केली होती. भारतीयांचा अनोखा सांस्कृतिक वारसा आणि एकत्रित ओळख या वैज्ञानिक संदर्भातून पहायला हवी. इतिहासाच्या मनमानी अर्थांच्या पलीकडे जाऊन, जो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केलेला इतिहास आहे, त्या संदर्भातून पाहणे आवश्यक आहे.
 
 
ज्यांना हे वादग्रस्त वाटते, ते अशा कोणत्याही डीएनए अहवालाचा संदर्भ देऊ शकतात का, ज्याने सिद्ध केले की, या देशातील अनुसूचित जाती किंवा जमातीचे डीएनए सवर्ण म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकांपेक्षा वेगळे आहेत? ज्यांना मुस्लिम म्हटले जाते, ज्यांना आक्रमकांनी मुस्लिम बनवले, त्यांचा आणि हिंदूंचा डीएनए वेगळा आहे का? झारखंड, केरळ आणि ईशान्येत ज्यांना ख्रिश्चन मिशनरीज आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात, ही धर्मांतरणाची प्रक्रिया त्यांचा डीएनए बदलू शकते का?
या फूट पाडणार्‍या राजकारणामागे धर्मांतरणाची मोठी यंत्रणा आहे. भारताची मूळ ओळख बदलून समाजाला आपल्या मूळ श्रद्धांपासून तोडत कट्टरपंथी बनवण्याचा खेळ सातत्याने सुरू असल्याचे विसरू नका. आम्ही एक आहोत, असे आपण म्हणतो, त्यावेळी दशकांपूर्वीचा जमवून आणलेला खेळ बिघडायला लागतो. कारण, भारताला विभाजित करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केलेले असतात.
 
 
पण, हे विसरता कामा नये की, राजकीय नकाशे बदलणे, सैन्य हल्ल्याच्या घटना या अखंड सांस्कृतिक प्रवाहासाठी थोडा अडथळा ठरल्या असल्या, तरी ते कायमस्वरूपी अडथळे नाहीत. हजारो वर्षांपासूनची ही पोषित संस्कृती आळस देते, त्यावेळी एखादा प्रसंग दशकांपासून झालेली छेडछाड पलटवून पुन्हा व्यवस्थित करतो. आपला डीएनए बदललेला नाही, आपल्यात तोच पराक्रम, तेच शौर्य, तोच गर्व, तेच पूर्वज आहेत आणि आपल्याला त्याच चेतनेची गरज आहे. या उद्बोधनास त्याच दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. आमचे कुणासोबतही वैमनस्य नाही. पण, ज्याला दुसरा वर्ग म्हटले जाते, ज्याची स्वतंत्र ओळख सांगितली जाते, त्यांच्या मनात विष कालवले जात असेल, तर त्या विषावर उतारा म्हणून आपण एक आहोत हे सांगणे आवश्यक आहे.
 
 
आम्ही बाबर नव्हे, रामाचे वंशज आहोत, आम्ही हिंदुस्तानी मुसलमान आहोत, असे उज्जैन येथील मुस्लिम चिंतक गुलरेज शेख सांगतात. जेव्हा गुलरेज शेख हे सांगतात, त्यावेळी कुणी एकटे गुलरेज शेख सांगत नाही, तर संपूर्ण धर्म ज्याला इतिहासाची माहिती आहे, स्वतःवर झालेल्या अत्याचारांची माहिती आहे तो याचा उद्घोष करतो आणि या उद्घोषात व सरसंघचालकांच्या उद्बोधनात कोणताही फरक नाही.
(लेखक पाञ्चजन्यचे संपादक आहेत.)