आधुनिक नलाने बांधला नवा चल सेतु

    दिनांक :18-Jul-2021
|
विश्वसंचार
- मल्हार कृष्ण गोखले
आपल्या प्रचंड वानरसैन्यासह प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर येऊन उभे राहिले. समुद्राने आपल्याला वाट द्यावी म्हणून त्यांनी त्याची प्रार्थना केली. पण समुद्र काही वाट सोडेना. संतापलेल्या श्रीरामांनी समुद्रावर आपला अमोघ बाण रोखला. तेव्हा समुद्र श्रीरामांना शरण आला आणि म्हणाला, ‘प्रभू , तुमच्या सैन्यात नल नावाचा वानर आहे. तो विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याला सेतू बांधण्याची आज्ञा करा. त्याने बांधलेला सेतू मी माझ्या शरीरावर तोलून धरेन. मग त्या सेतूवरून तुमचं सैन्य पलीकडे जाऊ द्या.’
 
 
PTI07_02_2021_000095B.jpg
 
हिंदू परंपरेत पूल बांधणार्‍या स्थपतीचा म्हणजेच आज आपण ज्याला अभियंता किंवा इंजिनिअर म्हणतो, त्याचा हा पहिला उल्लेख असावा. रामायण, महाभारत आणि अन्य प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये राजवाडे, उत्तुंग सौध असणारी भवने, मंदिरे, नद्यांचे विशाल घाट, बलाढ्य दुर्ग यांच्या बांधणीची भरपूर वर्णनं येतात. ते उभारणार्‍या बांधकाम विशारदांना स्थपती किंवा शिल्पी असं म्हटलेलं दिसतं.
केवळ सैनिकी उपयोगासाठी असे स्वतंत्र स्थपती किंवा शिल्पी होते का? की, जे सैन्याकाठी गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग तर उभारतीलच; पण शत्रूवर आक्रमण करून जाणार्‍या स्वकीय सैन्यासाठी चांगले रस्ते बनवतील? वाटेतल्या ओढे-नाले-नद्यांवर झटपट पूल बांधतील? त्याचवेळी आपल्या सैन्याला शत्रूपासून सुरक्षित करण्यासाठी असलेले पूल झटपट उद्ध्वस्त करतील? आपल्यावर आक्रमण करून येणार्‍या शत्रूसैन्याच्या मार्गात अडथळे आणतील? किंवा नदीचे उतार म्हणजे नदीतून अलीकडे-पलीकडे उथळ पाण्यातले मार्ग दाबून धरून शत्रूसैन्याला नदीपलीकडेच रोखून धरतील?
 
 
प्राचीन भारतीय सेनादलात अशी विशेष पथकं निश्चितच होती. आर्य चाणक्य अशी सगळी जबाबदारी असणार्‍या अधिकार्‍याला म्हणतो, ‘प्रशास्ता.’ चाणक्य लिहितो, ‘प्रशास्त्याने कूच करण्याच्या मार्गावर पुढे जावे आणि मजूर व सुतार यांच्या द्वारा सैन्याच्या रक्षणाची उत्तम सोय करून ठेवावी. जागोजागी पाण्याची सोय करावी. हत्ती, लाकडी ओंडक्यांचा पूल, बंधारा, नावा, लाकडांचे व बांबूंचे तराफे, भोपळे, चामड्याने मढवलेले करंडे, पखाली, होड्या, झाडांची खोडे आणि दोरखंड यांच्या साहाय्याने सैन्य नदीपार करावे. नदीवरील उताराची जागा शत्रूच्या ताब्यात असल्यास हत्ती व घोडे यांच्या साहाय्याने दुसर्‍या ठिकाणाहून रात्री सैन्य पलीकडे नेऊन अकस्मात छापा घालावा.’ आजपासून किमान अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारतातलं हे वर्णन आहे.
 
 
प्राचीन भारतातले राजे गजदल, रथदल, अश्वदल आणि पदाती किंवा पायदळ अशा चतुरंग दळानिशी युद्ध करीत. साहजिकच या युद्धाची गती संथ होती. आजच्या जगाच्या ज्ञात इतिहासानुसार ही गती बदलली ती इसवी सनाच्या 12व्या शतकात होऊन गेलेल्या मंगोल सम्राट चंगेझखान याने. जगाचा नकाशा पहा. मंगोलियातून निघालेल्या चंगेझच्या फौजांनी संपूर्ण मध्य आशिया खंड ओलांडत थेट युरोप खंडात आजच्या पोलंडपर्यंत धडक मारली होती. हा एवढा प्रचंड मुलूख त्याने आपल्या अतिशय गतिमान अशा अश्वदलाच्या टापांखाली अक्षरशः तुडवून काढला. हे करताना त्याने किती ओढे, नाले नि नद्या ओलांडल्या असतील? त्याच्या आघाडीच्या पथकांनी किती नि कशी पूर्वतयारी केली असेल?
 
 
अत्यंत गतिमान अशा घोडदळाची ही कल्पना तुर्कांनी उचलली आणि पाहता-पाहता अरबांना पाठी टाकून तुर्क हे इस्लामचे वाहक नि प्रसारक विजेते बनले. तुर्कांनी मध्यपूर्व जिंकली, पर्शिया काबीज केला. गांधार, सिंध, पंजाब जिंकून तुर्क गंगा-यमुनांच्या दुआबात उतरले आणि त्यांनी दिल्ली जिंकली. इ.स.च्या 13 व्या शतकाच्या अखेरीस गतिमान अश्वदलाच्या जोरावर तुर्कांनी दख्खन जिंकली. 14व्या शतकाच्या सुरुवातीस, मलिक काफूर हा सुलतान अल्लाउद्दिन खलजीचा लाडका गुलाम सेनापती दिल्लीहून निघाला. वाटेतली सगळी हिंदू राज्ये उद्ध्वस्त करीत तो थेट रामेश्वरला पोचला. रामेश्वराचं देऊळ पाहून त्याने तिथे मशीद उभारली. भारताचा नकाशा पहा. गंगा, यमुना, चंबळ, बेटवा, नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख मोठ्या नद्या आणि इतर अनेक छोट्या नद्या तो वेगाने ओलांडू शकला, त्या केवळ गतिमान घोडदळाच्या जोरावर. त्याच्या सैन्यात हालचालींना वेळ लागणारे हत्ती आणि पायदळ नव्हतेच मुळी.
 
 
तुर्कांची ही गतिमान युद्धपद्धती दक्षिणेत प्रथम निजामशहाचा बुद्धिमान वजीर मलिक अंंबर याने उचलली. त्याच्याकडून ती शहाजीराजे भोसले यांनी उचलली. त्यांचे सुपुत्र शिवराय यांनी त्या पद्धतीचा कमालीचा प्रभावी वापर करून तुर्कांनाच पाणी पाजलं. शिवरायांकडून ती उचलली छत्रपती शंभूराजांनी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य या मराठी सेनापतींनी आणि मग प्रतापी थोरल्या बाजीरावाने. हे सगळे लोक एकेका दिवसात 50-50 कोसांच्या मजला मारून, शत्रूला बेसावध गाठून, लुटून, मारून पसार होत. एक कोस म्हणजे दोन मैल किंवा 3.2 कि.मी. तरीही आपल्याला आश्चर्य वाटतंच की, घोड्याच्या पाठीवरून एका दिवसात 160 किमी अंतराचा पल्ला मारताना जेवणखाणं कुठे करीत असतील? मुख्य म्हणजे माणसांना आणि घोड्यांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था कशी करीत असतील?
 
 
शिवछत्रपती आणि पहिला बाजीराव यांना जोडणार्‍या या कालखंडात, म्हणजे 17 व्या शतकाचा अंत नि 18 व्या शतकाचा प्रारंभ या काळात युरोपात फ्रान्सचा राजा चौदावा लुई याच्या सैन्यात मार्कुस सॅबेस्टियन डि व्होबा या नावाचा एक प्रतिभावंत सेनापती निर्माण झाला. आज आधुनिक काळात आपण ज्याला मिलिटरी इंजिनिअरिंग किंवा सैनिकी अभियांत्रिकी विभाग असे म्हणतो. त्याचा पाया या मार्कुस डि व्होबाने घातला. फ्रेंच सैन्यासाठी किल्ले, लष्करी ठाणी, तोफा-बंदुका निर्माण करण्याची आणि साठवण्याची शस्त्रागारे; सैन्यासाठी घोडे, युद्धसामग्री, अन्न, पाणी वाहून नेणारे बैल, खेचरं, उंट यांची तसंच त्यांच्याही चारा-पाण्याची व्यवस्था; एखाद्या किल्ल्याला वेढा घातला तर त्या वेढ्यात तोफा-बंदुकांचे मोर्चे, खंदक उभे करणे, किल्ल्याच्या बुरुजाखाली भुयार खणून त्यात सुरुंग पेरणे अशा असंख्य कामांची व्यवस्था लावण्याचे; किंबहुना अशी व्यवस्था निर्माण करण्याचंच एक तंत्र डि व्होबा याने उभे केले. ‘सॅप’ म्हणजे वाट तयार करणे आणि ‘माईन’ म्हणजे सुरुंग पेरणे. ही कामं करणारे पथक म्हणून त्याला नाव पडलं ‘सॅपर्स अ‍ॅण्ड मायनर्स.’ मार्कुस डि व्होबाचा कालखंड आहे सन 1633 ते सन 1707.
 
 
आजच्या आपल्या भारतीय सैन्यातली ‘सॅपर्स अ‍ॅण्ड मायनर्स’ दलांची परंपरा ही अर्थातच ब्रिटिश आहे. कारण आर्य चाणक्याच्या वेळचे स्थपती किंवा शिवरायांच्या वेळचे हे रस्ते बनवणारे, रान तोडणारे लोक कशाप्रकारे काम करीत होते, हे आज आपल्याला माहीतच नाही. चिमाजी अप्पांचा सैन्यात आज ठाकूर आणि मान ठाकूर असे दोघे डोंबिवलीचे बंधू होते. त्यांनी रसईच्या किल्ल्याच्या सॅबेस्टियन बुरुजाखाली सुरुंग भरून तो उडवला. पडलेल्या भगदाडातून मराठी सैन्य आत घुसले. वसई फत्ते झाली. वसईत हिंदू सत्ता असावी यासाठी आन-मान ठाकूर त्या सुरुंगाच्या स्फोटात बलिदान झाले. ही 1739 सालची गोष्ट. म्हणजेच स्वराज्याच्या सैन्यात ‘सॅपर्स अ‍ॅण्ड मायनर्स’चं काम करणारे तरबेज लोक होते. फक्त त्यांची नेमकी कार्यपद्धती आज आपल्याला अज्ञात आहे. संशोधन करण्यास प्रचंड वाव आहे. पण संशोधकच नाहीत.
 
 
असो, तर इंग्रजांनी जशा सुरुवातीला बेंगॉल आर्मी, मद्रास आर्मी आणि बॉम्बे आर्मी अशा तीन सेना उभ्या केल्या; तशीच सहायक म्हणून त्याच तीन नावांची ‘सॅपर्स अ‍ॅण्ड मायनर्स’ पथकं उभी केली. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात या सर्व पथकांनी प्रत्यक्ष लढाऊ पथकांप्रमाणेच नेत्रदीपक कामगिरी केली. भारतीय सैनिक लढण्यात आणि लढाईसाठी आवश्यक त्या रचना निर्माण करण्यात कुठेही कमी नाही, हे सिद्ध झालं. स्वातंत्र्यानंतर या पथकांना ‘सॅपर्स अ‍ॅण्ड मायनर्स’ ऐवजी ‘इंजिनिअर ग्रुप’ असे नाव देण्यात आले. 1948 साली मद्रास सॅपर्स आणि मेजर जनरल थिमय्या यांनी जागतिक लष्करी क्षेत्रात एक चमत्कार घडवला. मद्रास सॅपर्सने झो जी ला या लद्दाखमधल्या अति दुर्गम खिंडीपर्यंत उत्तम रस्ता बांधला आणि 1 नोव्हेंबर 1948 या दिवशी त्या रस्त्यावरून जनरल थिमय्यांनी 11 हजार फूट उंचीवरच्या झो जी ला मध्ये स्टुअर्ट रणगाडे नेऊन उभे केले. जगभरचे लष्करी तज्ज्ञ वेडे झाले.
 
 
नुकतीच या ‘कोअर ऑफ इंजिनिअर्स ऑफ इंडियन आर्मी’ या पथकामध्ये बारा नव्या पुलांची भर पडली आहे. म्हणजे काय? तर हे चल किंवा कुठूनही कुठेही घेऊन येतील असे पूल आहेत. 27 फूट लांब आणि 4 फूट रुंद असे हे मजबूत पूल चिलखती गाड्यांवरून कुठेही नेता येतील. समजा लष्करी वाहनांचा एक ताफा कामगिरीवर चाललाय. वाटेत खंदक, ओढा, नाला, नदी, दलदल असा कोणताही अडथळा आला, तर चिंता नको. त्या अडथळ्यांवर हा पूल उघडून पसरा. वाहनं पलीकडे गेली की पूल मिटा, गुंडाळा, गाडीवर टाका की निघाले पुढे! या पुलाचं संशोधन डी. आर. डी. ओ. उर्फ रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन यांनी केलंय, तर प्रत्यक्ष उत्पादन लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने केलंय.
 
7208555458
(लेखक, प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत.)