प्रतीक्षा संपली!

    दिनांक :18-Jul-2021
|
- अमृता वाडीकर
हो, नाही म्हणता म्हणता ऑलिम्पिक स्पर्धा होणार हे आता स्पष्ट झालं आहे. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र 2021 उजाडलं तरी कोरोनाचा कहर संपत नसल्यामुळे या स्पर्धेवर टांगती तलवार होती. मात्र अनेक आव्हानं, अडचणी आणि विरोधाला समोरं जात जपान ऑलिम्पिक आयोजनावर ठाम राहिलं आणि आता ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्याचं आव्हान या देशाला पेलायचं आहे. 23 जुलै ते आठ ऑगस्ट या काळात उन्हाळी ऑलिम्पिक होणार असून त्यानंतर पॅरालिम्पिक होणार आहे.
 
 
olympic1.jpg_1  
 
ऑलिम्पिक आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी आव्हानं संपलेली नाहीत. कोरोनाचा धोका हे या स्पर्धेपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. जगभरातून येणार्‍या खेळाडूंची व्यवस्था पाहण्यापासून त्यांना कोरोनाची लागण होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाप्रसाराबाबत ऑलिम्पिक स्पर्धेला दोषी धरलं जाऊ नये, यासाठी आयोजकांना प्रत्येक आघाडीवर लढावं लागणार आहे. म्हणूनच हे ऑलिम्पिक अनेक अर्थांनी अनोखं ठरणार आहे. कोरोनाचा प्रसार बघता या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. म्हणजेच खेळाडूंना रिकाम्या मैदानांमध्येच खेळावं लागणार आहे. त्यातच टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून आठ जुलै ते 22 ऑगस्ट या काळात ही आणीबाणी लागू असेल. जपानमध्ये एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेमुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली जात होती. जपानमध्ये यासाठी तीव्र आंदोलनं करण्यात आली. डॉक्टरांच्या संघटनेनेही पत्र लिहून ऑलिम्पिकचं आयोजन करू नये, असं आवाहन केलं होतं. मात्र जपानने कोणत्याही विरोधाला न जुमानता ऑलिम्पिक आयोजनाचं उद्दिष्ट समोर ठेवलं आणि आता हे उद्दिष्ट साध्य करण्याचा क्षण जवळ येत आहे. जपान ऑलिम्पिकचं आव्हान कसं पेलणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. उगवत्या सूर्याच्या या देशासाठी हा कसोटीचा काळ आहे.
 
 
 
जपानला अनेक आघाड्यांवर लढायचं आहे. मुळात जपानने इतर विकसित देशांच्या तुलनेत उशीरा म्हणजेच फेब्रुवारीनंतर कोरोनाविरोधी लसीकरणाला सुरूवात केली.जपानच्या 126 दशलक्ष इतक्या लोकसंख्येपैकी फक्त 15 टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. त्यातही टोकियो आणि ओसाका या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रकोप अधिक असून 65 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यावर इथल्या प्रशासनाचा भर आहे. ऑलिम्पिक दरम्यान कोरोना पसरू नये, यासाठी विविध देशांमधून येणार्‍या खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, युगांडाच्या चमूतले दोन सदस्य तसंच लिथुआनिआचे दोन आणि इस्रायलचा एक खेळाडू पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंतेत अधिक भर पडली. त्यातच टोकियोमध्ये अवघ्या आठवड्याभरातच कोरोना संक्रमणाचा दर 33 टक्क्यांनी वाढल्याचंही समोर आलं. म्हणूनच मास्क घालणं, शारीरिक अंतर राखणं यासारख्या कोरोनानियमांची काटेकोर अंमलबजावणी आयोजकांना करावी लागणार आहे. तसंच खेळाडूंच्या सतत चाचण्या कराव्या लागणार आहेत. यामुळे अर्थातच जपानच्या अर्थव्यवस्थेवर ताण येणार आहे. त्यातच जपानमधल्या नागरिकांचीही नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे.
 
 
एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे जपानमधला उन्हाळा खेळाडूंची परीक्षा पाहणार आहे. जपानमध्ये जून ते ऑगस्ट या काळात तीव्र उन्हाळा असतो. त्यातच प्रचंड आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहतात. अशातच उष्माघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यातच मुखपट्टी घालणं बंधनकारक असल्यामुळे अधिक घामाघूम व्हावं लागणार आहे. कोरोनाचे नियम पाळण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे उष्माघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनामुळे ऑलिम्पिक पुढे ढकललं जाण्याआधीपासूनच परदेशी प्रेक्षकांना टोकियोमधल्या प्रचंड उष्णतेची चिंता सतावत होती. मात्र आता ऑलिम्पिक होत असलं तरी प्रेक्षकांना बंदी घालण्यात आल्यामुळे परदेशी पाहुणे जपानमध्ये येणार नाहीत. अथेन्स तसंच बीजिंगसारख्या जपानपेक्षाही अधिक उष्ण असणार्‍या शहरांमध्ये ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं असलं तरी जपानी वातावरणात येणारा घाम सगळ्यांची चिंता वाढवणारा आहे. प्रचंड उष्ण हवामानामुळे ऑलिम्पिक मॅरेथॉन तसंच रेसवॉकची ठिकाणं बदलण्यात आली आहेत. चालणं, ट्रायथलॉन आणि बीच व्हॉलिबॉल खेळणार्‍या खेळाडूंना उष्माघाताचा अधिक धोका असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे कोरोनासह उष्माघाताचा धोका टाळण्यासाठीही सर्व उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यातच यंदा खेळाडूंना ऑलिम्पिक मेडल स्वत:च गळ्यात घालून घ्यावं लागणार आहे. एका ट्रेमधून पदक खेळाडूंसमोर आणलं जाईल आणि खेळाडूंना ते स्वत:च घालावं लागणार आहे. शारीरिक दुरावा रहावा यासाठी हा नियम करण्यात आला आहे. यासोबतच हस्तांदोलन आणि गळाभेटीवरही बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्व बंधनांमध्ये ऑलिम्पिक आयोजनाचं अग्निदिव्य पार पाडावं लागणार आहे.
दरम्यान, ऑलिम्पिकचे वेध लागायला सुरूवात झाली की भारतीयांच्या खेळाडूंकडून असणार्‍या अपेक्षा वाढतात. भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करावी अशी अवघ्या भारतीयांची अपेक्षा असते. प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत अगदी मोजकीच पदकं पडतात आणि मग पदकविजेत्या खेळाडूचं प्रचंड कौतुक होतं. यंदा भारताकडून 228 खेळाडूंचा चमू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असून हा ऑलिम्पिकच्या इतिहासातला आजवरचा सर्वात मोठा चमू आहे. यात 119 अ‍ॅथलिट्सचा समावेश असून त्यात 67 पुरुष आणि 52 महिला खेळाडू आहेत. भारतीय खेळाडू 85 क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. आता यापैकी भारताच्या पदरात किती पदकं पडणार, हे येणारा काळच ठरवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंशी संवाद साधला. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. ताज्या आत्मविश्वासाच्या बळावर आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
 
 
याआधीच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला अवघ्या दोन पदकांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यातही आपल्याला एकही सुवर्णपदक पटकावता आलं नव्हतंं. रिओ ऑलिम्पिक भारताला अजिबात फळलं नव्हतं. आता मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू पदकं जिंकतील अशी आशा आहे. नेमबाजीत सौरभ चौधरीकडून भारताला बर्‍याच अपेक्षा आहेत. त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असून तो नेमकी कशी कामगिरी करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सौरभ द्वितीय मानांकित नेमबाज आहे. सौरभने दिल्ली आणि म्युनिचमध्ये आयोजित जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं पटकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 2019 मध्ये त्याने ही पदकं पटकावली. आता तो ऑलिम्पिकसाठी सज्ज झाला आहे. सौरभ चौधरी आणि मनु भाकर या जोडीकडूनही पदकाच्या अपेक्षा आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये मणीपूरच्या मीराबाई चानूकडून अपेक्षा आहेत. 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाईने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर तिने प्रगतीच केली आहे. 2018 मध्ये तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने काही विक्रमही केले. त्यामुळे ती आत्मविश्वासाने या स्पर्धेत सहभागी होईल. कुस्तीमध्ये बजरंग पुनियाकडून अपेक्षा आहेत. बजरंगने तीन वेळा कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदकं पटकावली आहेत. याचीच पुनरावृत्ती करण्याची संधी त्याला आहे. टोकियोमध्ये तो काय कमाल करणार हे पहावं लागेल. बजरंग 65 किलो वजनी गटातला क्रमांक एकचा खेळाडू असल्यामुळे तो प्रतिस्पर्ध्याला चित करू शकतो.
 
 
बॉक्सिंगमध्ये मेरी कोमप्रमाणेच अमित पंघालकडूनही अपेक्षा आहेत. मेरीला ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावायचं आहे. आपल्याकडे इतर सगळी पदकं असून आता फक्त ऑलिम्पिक पदक पटकवायचं आहे असं तिने म्हटलं आहे. तिरंदाजीमध्ये अर्थातच दीपिकाकुमारी हे भारताचं आशास्थान आहे. तिने नुकतीच सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. आटानू दास आणि दीपिकाकुमारी हे पती- पत्नी जोडीने पदकावर निशाणा लावू शकतात. यासोबतच बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूकडून सुवर्णमयी कामगिरीची अपेक्षा आहे. कुस्तीमध्ये विनेश फोगाटही पदक पटकवू शकते. या यादीत अधिक खेळाडूंची भर पडावी, हीच अपेक्षा आणि भारतीय अ‍ॅथलिट्सना ऑलिम्पिकसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑलिम्पिकची प्रतीक्षा संपली; आता आपल्या खेळाडूंनी पदकांचा दुष्काळ संपवावा, हीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे.