एका क्लिकवर मिळते ग्राहकांना माहिती

    दिनांक :20-Jul-2021
|
- दररोज जातात ३ हजारावर पार्सल
- आरएमएसचे पोस्टइन्फो अ‍ॅपवर
 
 
नागपूर, 
टपाल सेवेशी संबंधित इत्थंभूत माहिती पोस्टइन्फो अ‍ॅपवर उपलब्ध आहे. पार्सलच्या वजनानुसार ते पाठविण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती घरबसल्या घेता येऊ शकते. पिनकोडसह अन्य आवश्यक माहितीही उपलब्ध आहे. याशिवाय बूक केलेले पार्सल नेमके कुठपर्यंत आले, त्याची माहिती सांकेतिक क्रमांक टाकताच एका क्लिकवर उपलब्ध होते. 
 
postinfo _1  H
 
 
पार्सल बूक करताना वजनानुसार शुल्काची आकारणी केली जाते. आतील वस्तूचे विवरणही नमूद करावे लागते. गैरकायदेशीर बाबी पार्सलमधून जाऊ नये यादृष्टीने संपूर्ण खबरदारी घेतली जाते. अर्धा किलोपेक्षा अधिक वजनाचे प्रत्येक पार्सल उघडून कर्मचारी त्यांच्यासमोर पॅक करतात.
 
 
 
इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल विभागानेही कार्यप्रणालीत बदल स्वीकारले. त्याच बळावर खासगी स्पर्धकांना तोंड देत पोस्ट खात्याने आपले महत्त्व अबाधित ठेवले आहे. नातेसंबंधात पत्रातून होणारा संवाद थांबला असला तरी पोस्ट खात्याकडून व्यावसायिक कंपन्यांना सेवा देण्यावर भर दिला. पार्सल सेवा व स्पीड पोस्टलाही चांगला प्रतिसाद आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील आरएमएसमार्फत तब्बल ३ हजार पार्सल रेल्वेतून रवाना करण्यात येतात. प्रामुख्याने जीटी एक्सप्रेस, दक्षिण एक्सप्रेस, हावडा मेल आणि अहमदाबाद एक्सप्रेसमधून देशाच्या चारही भागात पार्सल पाठविले जातात. देशाच्या चारही भागातून नागपुरात येणाऱ्या पार्सलची संख्याही मोठी आहे.
 
 
 
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर पहिल्या टाळेबंदी दरम्यान रेल्वे आणि टपाल विभागाने संयुक्तरित्या पार्सल सेवा आरंभली. कमी दरात थेट रस्तेमार्गाने पार्सल वाहतुकीचा पर्याय सुरू झाल्याने या सेवेला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
 
  
पोस्टाचे स्वरूप काळानूरूप बदलले
पोस्टाचे स्वरूप काळानूरूप बदलत आहे. नेहमीचे पत्र कमी झाले असले तरी व्यावसायिक उपक्रम, पार्सल, स्पीड पोस्टचा प्रतिसाद सातत्याने वाढतो आहे. ही सेवा अधिक गतीमान होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. असे रेल्वे मेल सव्र्हिसचे अधीक्षक रमण्णा यांनी सांगितले.