वधू-वरांची लगीनघाई, टाळेबंदीची भरपाई

    दिनांक :20-Jul-2021
|
- साक्षगंधाला फाटा, थेट लग्नाच्या वाटा
- लग्नाळूंना वाटतेय् पुन्हा टाळेबंदीची भीती
 
 
नागपूर, 
लग्न म्हणजे प्रारंभ नवीन प्रवासाचा. लग्न म्हणजे सोहळा नवीन नात्याचा. लग्न म्हणजे तो क्षण ज्याची खूप असते आतुरता. मन मात्र, बावरून जाते तो क्षण अनुभवता. लग्नाचा दिवस हा प्रत्येक नववधू आणि वरासाठी विशेष असतो. या दिवसाची सारेच प्रतीक्षा करतात. काहीजण प्रतीक्षा करून थकतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा दिवस येत नाही. मात्र, ज्यांच्याकडे सर्व काही असताना, त्यांना आयुष्याची नवीन सुरुवात करता आली नाही, त्यांच्या आनंदात टाळेबंदी अडसर ठरली.
  
wedding _1  H x
 
 
खरं सांगायचे झाल्यास टाळेबंदीनेच वधू वरांच्या इच्छेवर पाणी फेरले. मंगल कार्ये थांबल्याने वय वाढत चालले. आत्ता नाही थांबायचे, झटपट उरकून घ्यायचे, अशाच तयारीत आहेत लग्नाळू आता. सांक्षगंधाच्या औपचारिकतेवरही पाणी सोडण्याची त्यांची तयारी आहे. थेट लग्नाचा बार उडवित आहेत. पुन्हा टाळेबंदी लागली तर? इच्छा... अपेक्षा सारे जागच्या जागी असेल.
 
 
 
लग्न म्हणजे वधुवर आणि त्यांच्या कुटुंबांसाठी विशेष बाब असते. लग्नामुळे दोन जीव आयुष्यभरासाठी एकत्र येतात. लग्न ठरलं की, त्यांच्या कुटुंबाबरोबरच नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. परंतु टाळेबंदीने त्यांचा आनंद हिरावला. नोकरी नाही म्हणून अनेकांना लग्न करता येत नाही. परंतु ज्यांना नोकरी आहे, घर आहे, कुटुंब व्यवस्थित आहे, सारे काही सुरळीत असतानाही लग्नकार्ये थांबली आहेत. केवळ टाळेबंदी अडसर ठरत आहे.
 
 
 
टाळेबंदीमुळे लग्नाळूंचे वय वाढत चालले आहे. विविध समस्या निर्माण झाल्या. कधी मिळेल टाळेबंदीला उसंत म्हणून भविष्याची स्वप्न रंगविणारे प्रतीक्षेत होते. आत्ता कुठे थोडीफार उसंत मिळाली. या संधीचे सोने झालेच पाहिजे म्हणून विवाहासाठी होकार भरलेले युवक-युवती आणि त्यांचे कुटुंबीय कामाला लागले. अनेक दिवस मुली, मुले पाहण्यात घालविले जात आहेत. पुन्हा टाळेबंदीच्या भीतीने साक्षगंधाच्या औपचारिकतेलाही फाटा आहे. भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण ठेवत आयुष्याची नवी सुरुवात केली जात आहे. थेट लग्नसमारंभ उरकून घेत आहेत. एकंदरीत हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न-संसार आणि जबाबदारीने फुलवित आहेत.