अजित पवारांचा संताप...फ्लेक्स लावायला मी सांगितले का?

    दिनांक :21-Jul-2021
|
पुणे, 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात फ्लेक्सबाजी करण्यात आली. यासंदर्भात विचारले असता अजित पवार चांगलेच संतापले. फ्लेक्स लावायला, अनधिकृत होर्डिंग्ज लावायला मी सांगितले होते का, गुन्हेगार मला शुभेच्छा देतात, त्यात माझा काय दोष? चुकीचे होर्डिंग्ज असतील तर पोलिसांनी ते काढावे, असे त्यांनी सांगितले.
 
maah_1  H x W:
 
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करू नये, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नये, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनी किंवा डिजिटल स्वरूपात व्यक्त कराव्या, सर्वांनी नियमांचे पालन करून राज्याला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. असे असतानाही त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांनी पुण्यात सर्वत्र शुभेच्छा देणारे फ्लेक्स व होर्डिंग्ज लावले. यावरून त्यांच्या संतापाचा चांगलाच भडका उडाला.
 
 
अजित पवार आज पुण्यात होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भातही भाष्य केले. शाळा सुरू व्हाव्या, असे प्रत्येक विभागाचे मत आहे. आगामी 100 दिवस महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागात अजूनही लोक जबाबदारीने वागत नाही. यंत्रणांनी सध्याची शिथिलता आणखी कठोर करायला हवी, असे ते म्हणाले.