कोरोना संसर्गानंतर शरीरात नऊ महिने अँटीबॉडी

    दिनांक :21-Jul-2021
|
लंडन, 
कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरामध्ये नऊ महिन्यांपर्यंत अँटीबॉडी राहत असल्याचा निष्कर्ष संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे. या संदर्भात इटली देशातील एका गावातून माहिती संकलित करण्यात आली होती. जगभरात कोरोना विषाणू संसर्गाला मात देण्यासाठी विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. पडुआ विद्यापीठ आणि इम्पेरियल कॉलेजमधील संशोधकांनी इटलीतील एका गावाचा अभ्यास केला.
 
intre_1  H x W:
 
सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील 85 टक्के नागरिकांची मागील वर्षी फे ब्रुवारी-मार्चमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यानंतर मे आणि नोव्हेंबरमध्येही नोंदी पार पडल्या. त्यानुसार नोव्हेंबरमध्येही संबंधित नागरिकांच्या शरीरात लक्षणीय प्रमाणात अँटीबॉडी दिसून आल्या. विशेष म्हणजे लक्षणे असणार्‍या आणि लक्षणे नसणार्‍या दोन्ही रुग्णांमधील अँटीबॉडीच्या प्रमाणात फार फरक दिसून आला नाही. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती ही लक्षणे वा संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून नसल्याचे सिद्ध होते, असे इम्पेरियल कॉलेजमधील इलारिया डोरिगट्टी यांनी सांगितले.
 
 
संशोधनातील निष्कर्षानुसार, चारपैकी एकामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही संसर्ग झाला. एखाद्या व्यक्तीकडून मोठ्या गटाला संसर्ग झाल्याचे प्रकारही दिसून आले नाहीत. दरम्यान, कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलत असल्याने शास्त्रज्ञांसमोरील आव्हाने वाढली आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढत असल्याने जागतिक आयोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.