सीएए-एनआरसी हा हिंदू-मुस्लिम विषय नाही

    दिनांक :21-Jul-2021
|
- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
गुवाहाटी, 
नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) या दोन्ही विषयांना केवळ राजकीय फायद्यासाठी हिंदू आणि मुस्लिम असा मुद्दा बनविण्यात आला. हा हिंदू आणि मुस्लिम असा विषयच नाही. आपल्या देशाचा नागरिक कोण आहे, हे माहीत करण्याची प्रत्येक देशाची एक पद्धत असते. त्याचाच एनआरसी हा एक भाग आहे. ही प्रक्रिया कुणाच्याही विरोधात नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज बुधवारी येथे केले.
 
natr_1  H x W:
 
संघाचे कार्य करणार्‍या आमच्या लोकांच्या मनात सर्वांच्याच कल्याणाची भावना आहे. सत्याच्या मार्गावर चालण्याचा आमचा संकल्प असतो, असे सरसंघचालकांनी ‘सिटीझनशिप डिबेट ओव्हर एनआरसी अ‍ॅण्ड सीएए; आसाम अ‍ॅण्ड दर पॉलिटिक्स ऑफ हिस्टरी’ या पुस्तकाचे विमोचन करण्यासाठी आयोजित समारंभात बोलताना सांगितले. सीएए आणि एनआरसी कोणत्याही भारतीय नागरिकाच्या विरोधात तयार करण्यात आलेला कायदा नाही. भारताचे नागरिक असलेल्या मुस्लिमांना सीएएमुळे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 
 
या पुस्तकाचा एक निष्कर्ष आहे आणि तो आपल्या सर्वांसमोर आला आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवरून गोंधळ निर्माण करण्याची पद्धत आहे. आता तर या पुस्तकावरूनही गोंधळ निर्माण केला जाऊ शकतो. लेखकाने काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल, तेव्हा तुमच्या लक्षात सर्व काही येईल. आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्यासमोर आल्या नाहीत किंवा येऊ दिल्या गेल्या नाहीत, अशा गोष्टी या पुस्तकात आहेत, असे मोहनजी म्हणाले. आम्हाला जगातील कोणत्याही भाषेशी, धर्माशी किंवा कोणत्याही गोष्टीशी समस्या नाही. कारण, आमचे धोरण ‘वसुधैव कुटुंबकम्’ आहे. आमच्या देशात किती वेगवेगळे राज्य होते. मात्र, व्हिसा, पासपोर्ट काहीच नव्हते. तरीदेखील यात्रा होत होत्या. हिमालयापासून कन्याकुमारी, कच्छपासून कामरूपपर्यंत लोकांची ये-जा सुरू होती. कारण, आमच्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राज्य आहे, देश आहे. आम्ही ‘स्वदेशोभुवनत्रयः’ हा सिद्धांत मानतो आणि हीच आमची विचारधारा आहे, असे विचार त्यांनी मांडले.
 
 
देशात 1930 पासून योजनाबद्ध रीतीने मुस्लिमांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न झाले. याचे कारण जसे सांगण्यात आले तसे भीतीचे होते की आणखी काही वेगळे होते. आर्थिक गरज होती, हेदेखील कारण नव्हते, लोकसंख्या वाढविण्याचा तो एक सुनियोजित विचार होता. आपली लोकसंख्या वाढवायची आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करून, भारताला पाकिस्तान बनवायचे, हा त्यामागील विचार होता.
 
 
हा विचार पंजाबसाठी होता, सिंधसाठी, आसामसाठी आणि बंगालसाठीही होता. काही प्रमाणात ते खरेही ठरले. भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र, जसे पूर्णपणे हवे होते, ते मिळाले नाही. आसाम मिळाला नाही, बंगाल अर्धाच मिळाला, पंजाबही अर्धा मिळाला. मधला कॉरिडोर त्यांना हवा होता, तो मिळाला नाही. तरीही मागून जे मिळाले, ते कशा पद्धतीने स्वीकारायचे, यावरही विचार झाला. काही लोक पीडित होऊन आले, ते शरणार्थी होते. काही लोक निव्वळ लोकसंख्या वाढविण्याच्या उद्देशाने आले. संख्या वाढविण्यासाठी त्यांना मदतही मिळत होती, आजही अशी मदत दिली जात आहे. जितक्या भूभागावर आपली संख्या वाढेल, त्या भागात सर्व काही आपल्या मनासारखेच होईल, जे आपल्यापेक्षा वेगळे आहेत, ते आपल्या दयेवर तिथे राहतील किंवा जातील. पाकिस्तान, बांगलादेशात हेच झाले, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
 
ही आहे आमची संस्कृती
आपल्या देशात आधीपासूच धार्मिक स्वातंत्र्य आहे. आम्ही परमेश्वराला एकाच रूपात पाहातो, कुणी त्याला दुसर्‍या रूपात पाहात असेल. आमच्या भक्तीत आम्ही ठाम आहोत, तुमच्या भक्तीत तुम्ही ठाम आहात. एकमेकांच्या भाषेचा आदर, सन्मान करून आपण एकत्र राहूया. या गोष्टी सारेच करतात, त्या आदर्श म्हणून केल्या जातात. मात्र, या आदर्शावर प्रत्यक्ष कृती फक्त भारताची पारंपरिक संस्कृतीचे पालन करणारी व्यक्तीच करू शकते आणि हीच आमची संस्कृती आहे, असेही सरसंघचालक पुढे म्हणाले.
 
जगापासून धर्मनिरपेक्षता शिकायची नाही
धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही या गोष्टी आम्हाला जगापासून शिकायच्या नाहीत. ही आमचीच परंपरा आहे आणि या सर्व गोष्टी आमच्या रक्तात आहेत आणि म्हणूनच अधिक प्रामाणिकपणे या सर्व गोष्टी आपल्या देशात आहेत आणि त्या अस्तित्वातही आहेत. भाऊराव देवरस एकदा इंग्लंडला गेले होते. तिथे त्यांनी राजकीय नेते, खासदार आणि नाईटहूडची उपाधी प्राप्त असलेल्या मान्यवरांसोबत जेवण केले. जेवण करताना एकाने देवरस यांच्या स्वागतार्ह भाषण केले. भारताशी आमचा संबंध आला, या देशाला आम्हीच लोकशाही दिली, असे यात सांगण्यात आले. भाऊराव देवरस अतिशय नम्रपणे म्हणाले की, तुमचे भाषण फारच चांगले होते, धन्यवाद. पण तथ्यात्मक चूक तुम्ही केली. ही लोकशाही तुमची देण नाही. कदाचित आमच्या देशातून ग्रीकमार्गे ती तुमच्यापर्यंत आली असावी. कारण, जेव्हा तुमचा देश आमच्यात नव्हता, तेव्हादेखील आमच्या देशात वैशाली, लिच्छवी असे अनेक गणराज्य होते.
 
प्रणव मुखर्जींच्या भेटीला दिला उजाळा
मोहनजी म्हणाले की, पहिल्यांदा माझी प्रणवदांशी भेट झाली होती. त्यांनीच सांगितले होते की, देशात धर्मनिरपेक्षतेवर चर्चा सुरू झाली आहे. धर्मनिरपेक्षता आम्हाला जगाकडून शिकावी लागेल का, आमची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. नंतर प्रणवदा म्हणाले की, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार धर्मनिरपेक्ष मानसिकतेचेच होते, आपल्याला कुणाकडून काहीच शिकण्याची गरज नाही. पाच हजार वर्षे जुनी असलेल्या आपल्या संस्कृतीने आपल्याला सर्वच काही शिकविले आहे. त्यासाठी जगाच्या शिकवणीची गरज नाही.
 
 
ही आमची कर्मभूमी आहे, कर्तव्यभूमी आहे, येथे राहणार्‍या प्रत्येकाचे या भूमीविषयी, समाजाविषयी कर्तव्य आहे आणि आपल्या देशातील संस्कृतीने ते निर्धारितही केले आहेत. हे कर्तव्य कुण्या समुदाय, पंथ किंवा पूजेवर आधारित नाही, असे प्रतिपादनही सरसंघचालकांनी केले.