मानहानीचा खटला रद्द करा

    दिनांक :21-Jul-2021
|
- कंगनाची उच्च न्यायालयात धाव
मुंबई, 
जावेद अख्तर यांच्या तक्रारीच्या आधारे महानगर न्यायदंडाधिकार्‍यांनी सुरू केलेला गुन्हेगारी स्वरूपाचा मानहानीचा खटला रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी बॉलीवूड अभिनेत्री कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधिज्ञ रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत तिने ही याचिका दाखल केली असून, केवळ पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावरून अंधेरीच्या महानगर न्यायदंडाधिकार्‍यांनी हा खटला सुरू केला आहे तसेच त्यांनी स्वतंत्रपणे साक्षी तपासल्या नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
 
maha_1  H x W:
 
दूरदर्शन वाहिनीवर आधारहीन वक्तव्य केल्याचा आरोप करीत जावेद अख्तर यांनी तिच्याविरोधात मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने जुहू पोलिसांना डिसेंबरमध्ये दिला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील चौकशीची गरज असल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने कंगनाच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करीत तिला समन्स बजावले होते. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.